डॉन : दुर्दैव, यश आणि या फ्रँचायजीच्या चढ-उताराची रंजक कहाणी

चित्रीकरणाला सुरुवात होण्याच्या काही आठवडे आधीच रणवीर सिंह 'डॉन 3' चित्रपटातून बाहेर पडला

फोटो स्रोत, Satish Bate/Hindustan Times via Getty Images

फोटो कॅप्शन, चित्रीकरणाला सुरुवात होण्याच्या काही आठवडे आधीच रणवीर सिंह 'डॉन 3' चित्रपटातून बाहेर पडला
    • Author, यासिर उस्मान
    • Role, बीबीसी हिंदीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 10 मिनिटे

'डॉन 3' या चित्रपटावरून निर्माण झालेला वाद आता फक्त अभिनेता रणवीर सिंह विरुद्ध फरहान अख्तर इतकाच मर्यादित राहिलेला नाही. आता यातून चित्रपटसृष्टीतील करार, जबाबदारी आणि उत्तरदायित्वाविषयीचे मोठे प्रश्नदेखील समोर आले आहेत. याला पुढे काय वळण लागतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मथळ्यातून फक्त वाद दिसतात. मात्र खरी कहाणी पडद्यामागे दडलेली आहे. ही एका अशा फ्रँचायझी (चित्रपट मालिका)ची कहाणी आहे, जिला मोठं यश तर मिळालं, मात्र गेल्या 48 वर्षांमध्ये तिनं काही ना काही अडथळे, वाद किंवा दुर्दैवाला देखील तोंड दिलं. 'डॉन 3' येईपर्यंत तर ती जणूकाही एक 'शाप'च ठरली आहे.

रणवीर सिंह या चित्रपटातून बाहेर पडण्याची सर्व कहाणी समजून घेण्याआधी आपल्याला चित्रपटांच्या इतिहासाची पानं उलटवून थोडं मागे जावं लागेल. डॉन या चित्रपटाला 48 वर्षांपूर्वी पहिल्यांदा दुर्दैवाला तोंड द्यावं लागलं होतं, तिथून ही कहाणी जाणून घ्यावी लागेल.

डॉनचा पाया आणि पहिला अपघात

याची सुरुवात होते 1974 सालापासून. दिग्दर्शक मनोज कुमार त्यांचा 'रोटी, कपडा और मकान' हा चित्रपट बनवत होते. चित्रपटाचं चित्रीकरण करत होते प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर नरीमन इराणी.

इराणी यांनी सुनील दत्त यांना घेऊन काही काळापूर्वी 'जिंदगी-जिंदगी' (1972) नावाचा चित्रपट बनवला होता. मात्र हा चित्रपट चांगलाच आपटला होता. त्यामुळे इराणी कर्जबाजारी झाले होते. ते अतिशय वाईट परिस्थितीतून जात होते.

मनोज कुमार यांनी त्यांना मदत करायचं ठरवलं. मग इराणी यांच्यासाठी एका नवीन चित्रपटाची निर्मिती करायचं निश्चित झालं. 'रोटी, कपडा आणि मकान' या चित्रपटात अभिनय करत असलेले अमिताभ बच्चन आणि झीनत अमान हे इराणींच्या मदतीसाठी लगेच तयार झाले.

अभिनेते प्राणदेखील सोबत आले. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मनोज कुमार यांचे तरुण सहाय्यक दिग्दर्शक चंद्रा बारोट यांना देण्यात आली.

'डॉन' चित्रपट 12 मे 1978 ला प्रदर्शित झाला आणि तो अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील पहिला मोठा सोलो ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला

फोटो स्रोत, PRAKASH SINGH / AFP) (Photo by PRAKASH SINGH/AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, 'डॉन' चित्रपट 12 मे 1978 ला प्रदर्शित झाला आणि तो अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील पहिला मोठा सोलो ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला

आता चित्रपट सुरू करण्यासाठी एका चांगल्या स्क्रिप्ट म्हणजे पटकथेचा शोध सुरू झाला.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

लेखक सलीम-जावेद यांच्याशी याबाबत चर्चा करण्यात आली. ते म्हणाले की त्यांच्याकडे एक पटकथा आहे. मात्र ती पटकथा अनेक निर्माते-दिग्दर्शक आणि अभिनेत्यांनी नाकारली होती. नरीमन इराणी यांना ती पटकथा देण्यास ते तयार झाले. या पटकथेचं नाव होतं 'डॉन'.

अतिशय कमी बजेटमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं. नरीमन इराणी यांना आशा निर्माण झाली होती. ते मेहनत घेऊन चित्रपट पूर्ण करण्याच्या कामाला लागले. मात्र दुर्दैवानं त्यांचा पिच्छा सोडला नाही. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच अपघात झाला.

ज्यांच्यासाठी हा चित्रपट बनवण्याचं ठरलं होतं, ते चित्रपटाचे निर्माते नरीमन इराणी यांच्यावरच चित्रीकरणादरम्यान एक भिंत कोसळली. या अपघातात इराणी यांचा मृत्यू झाला.

मात्र तरीदेखील सर्व टीमनं मिळून कसातरी हा चित्रपट तयार केला. इराणी यांच्या कुटुंबाला आधार मिळावा म्हणून चित्रपट पूर्ण करण्यात आला होता.

अखेरीस 12 मे 1978 ला 'डॉन' चित्रपट प्रदर्शित झाला. अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील हा पहिला मोठा सोलो ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला.

मात्र सर्वात दुदैवाची बाब म्हणजे ज्या व्यक्तीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा चित्रपट तयार करण्यात आला होता, ती व्यक्तीच हे यश पाहण्यासाठी जिवंत नव्हती.

शाहरुख खान आणि पहिल्या मतभेदाची कहाणी

सध्या 'डॉन 3' चित्रपट कठीण परिस्थितीतून जातो आहे. मात्र त्यामागचं खरं कारण समजून घ्यायचं असेल तर जेव्हा पहिल्यांदा मोठा वाद झाला होता, मतभेद झाला होता तिथून जाणून घ्यावं लागेल. शाहरुख खाननं 'डॉन 3' ला निरोप दिला तिथून हे समजून घ्यावं लागेल.

एका वाक्यात सांगायचं तर ही इतिहासाच्या खूपच लवकर पुनरावृत्ती होण्याची कहाणी आहे.

शाहरुख खानचा 'डॉन 2' (2011) हिट झाला होता. त्यावर्षीच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये त्याचा समावेश होता.

असं मानलं जातं की शाहरुखला या स्टायलिश पात्राबद्दल विशेष आपुलकी होती. तो 'डॉन'कडे एक दीर्घकाळ चालणारी फ्रँचायझी म्हणून पाहू लागला होता. दिग्दर्शक फरहान अख्तरनं देखील जाहीर केलं होतं की तो 'डॉन 3' वर काम करतो आहे.

मात्र पडद्यामागे हळूहळू परिस्थिती बदलत चालली होती.

प्रेक्षक 'डॉन 3'ची वाट पाहत होते. मात्र या कालावधीत 2 महत्त्वाच्या घडामोडी एकत्रच घडत होत्या.

पहिली गोष्ट म्हणजे 2011 मध्ये आलेल्या 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या हिट चित्रपटातील फरहान अख्तरच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. त्यानंतर आलेल्या 'भाग मिल्खा भाग' (2013) या चित्रपटानं तर हिरो म्हणून त्याला प्रतिष्ठा मिळवून दिली.

अभिनेता म्हणून अधिक सक्रिय झाल्यामुळे फरहानचं दिग्दर्शनाचं काम हळूहळू मागे पडू लागलं. त्याचा परिणाम असा झाला की 'डॉन 3' च्या 'पटकथेवरील काम' अनेक वर्षे सुरू राहिलं आणि चित्रपट रखडला.

दुसऱ्या बाजूला बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानच्या कारकिर्दीसाठी हा आव्हानात्मक काळ होता. त्याचे अनेक चित्रपट अपयशी ठरले होते. बॉलीवूडमध्येही बदल होत होते. फ्रँचायझी आणि सीक्वल्स हे नव्या काळाची ओळख बनले होते.

या दरम्यान मुलाखतींमध्ये शाहरुख खानला सातत्यानं 'डॉन 3' बद्दल प्रश्न विचारले जात होते.

'रईस' या त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळेस 2017 मध्ये शाहरुख प्रसारमाध्यमांना म्हणाला, "डॉन हाच कदाचित माझा एकमेव चित्रपट आहे ज्याचा सीक्वल बनू शकतो. मात्र फरहानजवळ अजून चित्रपटाची स्क्रिप्ट तयार नाहीये."

शाहरुख 'डॉन 3' च्या पटकथेची वाट पाहत होता. मात्र चित्रपटसृष्टीतील अंतर्गत सूत्रांनुसार, पडद्यामागची कहाणी यापेक्षा कितीतरी अधिक गुंतागुंतीची होती.

'फॅन', 'जब हॅरी मेट सेजल' आणि 'झीरो' सारखे शाहरुखचे बडे चित्रपट फ्लॉप झाले, तेव्हा प्रसारमाध्यमं आणि चित्रपटसृष्टीत अशी जोरदार चर्चा होऊ लागली की त्याचं सुपरस्टारडम आता ओसरू लागलं आहे.

अशा परिस्थितीत फरहान अख्तर आणि 'एक्सेल एंटरटेनमेंट' ही त्याची कंपनी 'डॉन 3' आणि शाहरुख खानवर मोठी गुंतवणूक करणं टाळत होते.

जाणकारांच्या मते, हा कोणताही मतभेद नव्हता. तर एका निर्मात्यानं विचारपूर्वक आणि सावधगिरीनं घेतलेला दृष्टीकोन होता. तो योग्य वेळेची वाट पाहत होता. चित्रपटाच्या मुख्य स्टारची बॉक्स ऑफिसवरील स्थिती अधिक मजबूत आणि स्थिर असण्याची तो वाट पाहत होता.

तर शाहरुखला 'डॉन 3' लवकर पूर्ण करायचा होता. कारण तो एका दमदार 'कमबॅक प्रोजेक्ट'च्या शोधात होता. त्यामुळे चित्रपटाला होत असलेल्या विलंबाबद्दल तो खूश नव्हता. तर दुसरीकडे अभिनेता म्हणून फरहान अख्तरचे ('रॉक ऑन 2', 'लखनऊ सेंट्रल', 'तूफान') अनेक चित्रपट फ्लॉप झाले. मात्र 'डॉन 3' चित्रपट काही पुढे सरकत नव्हता.

शाहरुख खान 'डॉन 3' च्या पटकथेची वाट पाहत होता, मात्र चित्रपटसृष्टीतील अंतर्गत सूत्रांनुसार, पडद्यामागील कहाणी यापेक्षा कितीतरी जास्त गुंतागुंतीची होती

फोटो स्रोत, SUJIT JAISWAL/AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, शाहरुख खान 'डॉन 3' च्या पटकथेची वाट पाहत होता, मात्र चित्रपटसृष्टीतील अंतर्गत सूत्रांनुसार, पडद्यामागील कहाणी यापेक्षा कितीतरी जास्त गुंतागुंतीची होती

मग 2023 चं वर्ष झालं. या वर्षी 'पठान' या चित्रपटातून शाहरुख खाननं ऐतिहासिक पुनरागमन केलं. सूत्रांनुसार, त्यावेळेस 'एक्सेल एंटरटेनमेंट' 'डॉन 3' चित्रपट पुन्हा सुरू करण्यासाठी अतिशय उत्साही झालं.

'डॉन 3' या चित्रपटाची नवीन पटकथा घेऊन फरहान शाहरुखला भेटला. मात्र आता शाहरुख खानचं प्राधान्य बदललं होतं. त्याचा कल आता मोठ्या बजेटच्या ॲक्शन चित्रपटांकडे झाला होता. 'डॉन 3' चित्रपटाबाबत फरहान आणि शाहरुख यांचे विचार जुळत नव्हते.

मे 2023 मध्ये शाहरुखनं 'डॉन'च्या फ्रँचायझीपासून स्वत:ला वेगळं केलं. ज्या सुपरस्टारनं 'डॉन'ला आधुनिक पॉप कल्चरचा भाग बनवलं, तो आता 'डॉन'पासून वेगळा झाला होता.

'डॉन'ची कहाणी इथेच संपू शकली असती. मात्र 'एक्सेल एंटरटेनमेंट'नं धाडसी पाऊल उचलत या फ्रँचायझीला पुन्हा सुरू करण्याचं ठरवलं. नवीन 'डॉन'च्या रुपात रणवीर सिंहचं नाव जाहीर करण्यात आलं.

'डॉन 3'च्या टीझरमध्ये रणवीर सिंहला नवीन 'डॉन'च्या रुपात सादर करण्यात आलं. त्यावेळेस चित्रपटसृष्टी आणि प्रसारमाध्यमांमध्ये तो या भूमिकेसाठी योग्य स्टार आहे का? यावर मोठी चर्चा सुरू झाली. स्वत: रणवीर या भूमिकेबद्दल अतिशय उत्साही होता.

त्याच्या करिअरमधील ही एक मोठी संधी होती. कारण या भूमिकेमुळे त्याचा समावेश थेट अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्यासारख्या मोठ्या कलाकारांच्या पंक्तीत होऊ शकला असता.

आता 'डॉन 3' पूर्ण होण्याची वाट पाहिली जात होती.

मात्र पडद्यामागे असं काय घडलं की चित्रीकरण सुरू होण्यापूर्वीच रणवीर देखील 'डॉन 3'मधून बाहेर पडला.

'धुरंधर'मुळे 'डॉन 3' ला फटका बसला का?

चित्रपटसृष्टीत सुरू असलेल्या चर्चेनुसार, रणवीरनं 'डॉन 3'मधून बाहेर पडणं हे फक्त एका घटनेमुळे झालं नव्हतं. तर हळूहळू घडत गेलेल्या अनेक गोष्टींचा तो परिणाम होता. 'डॉन 3'ची घोषणा झाल्यानंतर चित्रपटाची पटकथा आणि डेव्हलपमेंटवर काम सुरू होतं.

यादरम्यान रणवीर 'धुरंधर' या दुसऱ्या मोठ्या चित्रपटात पूर्णपणे व्यग्र झाला. तर फरहान अख्तरदेखील त्याच्या 'फरहान लाईव्ह' कॉन्सर्ट्स आणि '21 बहादूर' या त्याच्या चित्रपटाच्या चित्रीकरणात गुंतलेला होता. यात तो स्वत: मुख्य भूमिका करत होता.

सूत्रांनुसार, यादरम्यान 'डॉन 3'ची पटकथा सातत्यानं मागेपुढे होत होती. नवीन ड्राफ्ट तयार होत होते. मात्र जसजसा हा प्रोजेक्ट त्याच्या पटकथेच्या शेवटच्या टप्प्याजवळ पोहोचला, तसे दडलेले तणाव पुन्हा समोर येऊ लागले.

बॉलीवूडमध्ये हीच चर्चा आहे की 'धुरंधर'मुळे 'डॉन 3'समोर अडथळा निर्माण केला का?

ज्याप्रकारे 'पठान' आणि 'जवान' या चित्रपटांनी शाहरुख खानच्या करिअरची दिशा बदलली. त्याचप्रकारे 'धुरंधर'च्या प्रचंड यशामुळे रणवीर सिंहला नवीन स्टारडम मिळवून दिलं. त्याच्या करिअरमधील प्राधान्यक्रम बदलला.

याच दरम्यान 'डॉन 3' ची तयारीदेखील शेवटच्या टप्प्यात पोहोचली होती. नियोजनानुसार चित्रपटाचं चित्रीकरण जानेवारी 2026 मध्ये सुरू होणार होतं. ते पुढील जवळपास सहा महिने चालणार होतं.

'पठान' आणि 'जवान' या चित्रपटांनी जशी शाहरुख खानच्या करिअरची दिशा बदलली, त्याचप्रमाणे 'धुरंधर' च्या मोठ्या यशानं रणवीर सिंहला नवीन स्टारडम मिळवून दिलं

फोटो स्रोत, Prodip Guha/Getty Images

फोटो कॅप्शन, 'पठान' आणि 'जवान' या चित्रपटांनी जशी शाहरुख खानच्या करिअरची दिशा बदलली, त्याचप्रमाणे 'धुरंधर' च्या मोठ्या यशानं रणवीर सिंहला नवीन स्टारडम मिळवून दिलं

'एक्सेल एंटरटेनमेंट'शी संबंधित सूत्रांनुसार रणवीर सिंहनं आधीपासून तयारी देखील सुरू केली होती. नोव्हेंबर 2025 मध्ये त्यानं 'डॉन 3' चित्रपटासाठी ॲक्शन आणि स्टंटचं विशेष प्रशिक्षणदेखील घेतलं होतं. त्यासाठीचा सर्व खर्च 'एक्सेल एंटरटेनमेंट'नं केला होता.

मात्र 'डॉन' चित्रपटाचं दुर्दैवं संपलेलं नव्हतं.

डिसेंबर 2025 च्या शेवटच्या दिवसांमध्ये एक अनपेक्षित वळण आलं. रणवीर सिंहनं स्वत: निर्मात्यांना फोन करून 'डॉन 3'मधून बाहेर पडण्याचा निर्णय सांगितला. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे 'धुरंधर' 5 डिसेंबरला प्रदर्शित झाला होता आणि मोठा ब्लॉकबस्टर ठरला होता.

तिथून वादाची सुरुवात झाली.

'एक्सेल एंटरटेनमेंट'नुसार त्यांनी प्री-प्रोडक्शनवर जवळपास 45 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यात आंतरराष्ट्रीय लोकेशनची निवड, क्रू वरील खर्च, प्रशिक्षण, पोशाख आणि सेटचे सुरुवातीचे डिझाईन यांचा समावेश होता.

याच वादामध्ये अशीही अफवा पुढे आली की रणवीरला या चित्रपटासाठी निश्चित केल्यानंतर देखील निर्मात्यांनी हृतिक रोशनशी देखील 'डॉन'च्या भूमिकेशी चर्चा केली होती. सूत्रांनुसार या बातम्यांमुळे रणवीरची परिस्थिती आणखी गैरसोयीची झाली होती.

ही अफवा इतकी वाढली की फेब्रुवारी 2026मध्ये हृतिक रोशनला अधिकृतपणे ती नाकारावी लागली.

हृतिकनं सांगितलं, "सुरुवातीला जी फक्त एक अफवा होती, तिनं आता एक वेगळंच स्वरुप घेतलं आहे. त्यामुळे सत्य समोर येणं आवश्यक झालं आहे. मी स्पष्टपणे सांगतो की 'डॉन 3' साठी मला कधीही संपर्क करण्यात आलेला नाही. प्रसारमाध्यमांना माझी विनंती आहे की त्यांनी अशा पडताळणी न केलेल्या बातम्यांपासून दूर राहावं."

'डॉन'च्या वारशाशी अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्यासारख्या मोठ्या कलाकारांचं नाव जोडलेलं आहे

फोटो स्रोत, Debajyoti Chakraborty/NurPhoto via Getty Images

फोटो कॅप्शन, 'डॉन'च्या वारशाशी अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्यासारख्या मोठ्या कलाकारांचं नाव जोडलेलं आहे

सर्जनशीलतेबाबतचे मतभेद आणि वाढता वाद

रणवीर सिंहशी संबंधित सूत्रांचं म्हणणं आहे की 'क्रिएटिव्ह मतभेद' आणि पटकथेबाबतच्या चिंता हळूहळू वाढत गेल्या.

'डॉन'चा वारसा अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्यासारख्या मोठ्या कलाकारांशी जोडलेला आहे. रणवीरला वाटत होतं की जुन्या सुपरस्टारची जागा घेण्याइतकी 'डॉन 3' ची अंतिम पटकथा दमदार नाही.

वारसा आणि आशेच्या दबावामध्ये रणवीरनं धुरंधरमधून मिळालेलं ऐतिहासिक यश सांभाळण्याचा निर्णय घेतला. ज्या चित्रपटाबाबत त्याला पूर्ण खात्री नव्हती, त्यापासून तो वेगळा झाला.

तर निर्मात्यांकडून पूर्णपणे वेगळीच कहाणी सांगितली जाते. 'एक्सेल एंटरटेनमेंट' शी संबंधित लोकांचं म्हणणं होतं की जर रणवीरला चित्रपटाबाबत मूलभूत आक्षेप होते, तर त्यानं शेवटच्या टप्प्यापर्यंत तयारी का सुरू ठेवली?

हा वाद हळूहळू वैयक्तिक मतभेदाच्या पलीकडे वाढत गेला. नोंदवण्यात आलेल्या आर्थिक नुकसानीनंतर निर्माता फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयीज (एफडब्ल्यूआयसीई) मध्ये तक्रार नोंदवली.

त्यानंतर फेडरेशननं रणवीर सिंहच्या विरोधात 'नॉन-कोऑपरेशन डायरेक्टिव्ह' जारी केलं. याला चित्रपटसृष्टीत एकप्रकारे 'शॅडो बॅन' मानलं गेलं.

याला प्रत्युत्तर देताना रणवीर सिंहनं या फेडरेशनच्या अधिकार कक्षेला आव्हान देत कायदेशीर नोटीस पाठवली. कारण हा एक खासगी कराराचा वाद होता.

एक आठवड्यानंतर फेडरेशननं हे निर्देश मागे घेतले. तर 3 जूनला एफडब्ल्यूआयसीईचे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की अपील आणि चित्रपट उद्योगाचं व्यापक हित लक्षात घेऊन हे (नॉन-कोऑपरेशन डायरेक्टिव्ह) निर्देश तत्काळ मागे घेण्यात आले आहेत.

आमीर-सलमानसारख्या बॉलीवूडच्या बड्या कलाकारांनी यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

हा वाद सोडवण्यासाठी पडद्यामागे अनेक प्रयत्न करण्यात आले. या वर्षाच्या सुरुवातीला 'एक्सेल एंटरटेनमेंट'नं 'प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया'कडे संपर्क केला. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये चर्चा आणि मध्यस्थी घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.

सूत्रांनुसार, बॉलीवूडचे अनेक दिग्गजदेखील या प्रक्रियेत अधिकृतपणे किंवा बिगर-अधिकृतपणे सहभागी झाले. आमिर खान, सलमान खान, अनिल कपूर, आशुतोष गोवारीकर, रोहित शेट्टी आणि करण जौहर हा वाद मिटवण्यासाठी वेगवेगळ्या बैठकांमध्ये सहभागी झाले. या वादातून काही मार्ग काढता येईल का यासाठी हे प्रयत्न सुरू होते.

रणवीरचा आरोप आहे की चित्रपटाचं बजेट आणि त्याच्या मानधनात बरीच कपात करण्यात आली

फोटो स्रोत, Parveen Kumar/Hindustan Times via Getty Images

फोटो कॅप्शन, रणवीरचा आरोप आहे की चित्रपटाचं बजेट आणि त्याच्या मानधनात बरीच कपात करण्यात आली

जर 'धुरंधर' चित्रपट ब्लॉकबस्टर झाला नसता, तर रणवीरनं 'डॉन 3' सोडला नसता?

व्हरायटी डॉट कॉममध्ये छापलेल्या एका वृत्तामध्ये तर आणखी एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे.

त्यानुसार, मध्यस्थीसाठी झालेल्या एका बैठकीत जेव्हा आरोप-प्रत्यारोप होत होते, तेव्हा 'एक्सल एंटरटेनमेंट' मधील फरहान अख्तरचा पार्टनर निर्माता रितेश सिधवानी यानं रणवीरला थेट प्रश्न विचारला की - जर 'धुरंधर' ब्लॉकबस्टर झाला नसता, तर तू 'डॉन 3' सोडला असता का?

वृत्तात म्हटलं होतं की तिथे उपस्थित असलेल्या लोकांनुसार यावर रणवीरनं थेट उत्तर दिलं की त्या परिस्थितीत त्यानं कदाचित असं केलं नसतं.

सूत्रांनुसार, आणखी एक अनौपचारिक बैठकीत स्वत: रणवीर सिंहदेखील होता. तिथे त्यानं त्याची बाजू आणि त्यांना वाटणाऱ्या चिंता उघडपणे मांडल्या. त्याचा मुख्य मुद्दा असा होता की 'डॉन 3' ची पटकथा त्याच्या अपेक्षइतकी मजबूत, चांगली नव्हती.

तो असं म्हणाला की फरहान अख्तर त्याच्या अभिनयाच्या कामात आणि लाईव्ह कॉन्सर्ट्समध्ये व्यग्र असल्यामुळे 'डॉन 3' ला पूर्ण वेळ देऊ शकत नव्हता. याव्यतिरिक्त त्यानं असाही आरोप केला की चित्रपटाचं बजेट आणि त्याच्या मानधनामध्ये बरीच कपात करण्यात आली. त्यामुळे असंतोष आणखी वाढला.

अर्थात, निर्मात्यांनी हे सर्व दावे जोरदारपणे फेटाळले. त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे असे पुरावेत आहेत, ज्यातून दिसून येतं की रणवीर सिंह पटकथेवर काम सुरू असताना सातत्यानं सक्रिय आणि सकारात्मकरित्या याच्याशी जोडलेला होता. अनेक पटकथा वाचनामध्ये तो उत्साहीपणे सहभागी झाला होता.

याप्रकारे चर्चा आणि मध्यस्थी होऊनदेखील हा वाद मिटण्याऐवजी आणखी वाढतच गेला.

वादामुळे बिघडलेले नातेसंबंध

डॉन 3 चित्रपटाच्या वादाचा परिणाम फक्त चित्रपट आणि करारांपर्यंत मर्यादित राहिला नाही. असं म्हटलं जातं की याचा अनेक वैयक्तिक संबंधांवरदेखील मोठा परिणाम झाला आहे.

रणवीर सिंह याचे फरहान अख्तर आणि झोया अख्तर यांच्याबरोबर दीर्घकाळपासूनचे संबंध होते. 'दिल धडकने दो' आणि 'गली बॉय' या रणवीर सिंहच्या करिअरमधील दोन मोठ्या आणि यशस्वी चित्रपटाचं दिग्दर्शन झोया अख्तर यांनी केलं आहे. मात्र 'डॉन 3' च्या वादामुळे त्या विश्वासाला देखील तडा गेला आहे.

रणवीर सिंहचे फरहान अख्तर आणि झोया अख्तरबरोबर दीर्घकाळापासून संबंध राहिले आहेत

फोटो स्रोत, Prodip Guha/Getty Images

फोटो कॅप्शन, रणवीर सिंहचे फरहान अख्तर आणि झोया अख्तरबरोबर दीर्घकाळापासून संबंध राहिले आहेत

एक्सेल एंटरटेनमेंटशी संबंधित सूत्रांनुसार परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी रणवीरनं 10 कोटी रुपयांची नुकसान भरपाई आणि भविष्यात कोणत्याही प्रकारे एकत्र काम करताना मानधनात सूट देण्याचा प्रस्ताव दिला होता.

मात्र निर्मात्यांनी हा प्रस्ताव मान्य केला नाही. ते 45 कोटी रुपयांच्या पूर्ण नुकसान भरपाईवर ठाम राहिले.

या आरोपांबाबत रणवीर सिंहनं सार्वजनिकपणे काहीही म्हटलेलं नाही.

असं असलं तरी, 25 मे ला त्याच्या प्रवक्त्याकडून जारी करण्यात आलेल्या वक्तव्यात म्हटलं होतं, "'डॉन 3' शी संबंधित अलीकडच्या घडामोडींमध्ये त्यानं मुद्दाम शांत राहण्याचा निर्णय घेतला आहे. कारण त्याला वाटतं की व्यावसायिक चर्चा आणि खासगी संबंध सन्मानानं, परिपक्वतेनं आणि परस्पर आदरानं हाताळले पाहिजेत."

हा वाद अजून संपलेला नाही, हे स्पष्ट आहे. एक्सेल एंटरटेनमेंटसमोर पुन्हा तोच प्रश्न उभा ठाकलेला आहे की पुढील डॉन कोण असू शकतो?

डॉन चित्रपटातलं हे वाक्य प्रसिद्ध आहे. 'डॉन को पकडना मुश्किल ही नही नामुमकिन है.'

या पार्श्वभूमीवर असं म्हणावं लागतंय की अशा डॉनच्या भूमिकेसाठी मोठा स्टार शोधणंदेखील आता जवळपास अशक्य होत चाललं आहे.

कारण 'डॉन 3' शापामागे अनेक वर्षांचा इतिहास, अपूर्ण पटकथा, मोडलेला विश्वास आणि कायदेशीर गुंतागुंत यांचं एक मोठं सावट आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)