कोलकाता : दुर्गापूजा मंडप चेंगराचेंगरीत 19 जणांचा मृत्यू; भाजपचे मंत्री म्हणतात, 'कभी-कभी हो जाता है'

फोटो स्रोत, ANI
- Author, विष्णुकांत तिवारी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
कोलकात्याच्या चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी होऊन सुमारे 19 जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी झाले आहेत.
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (17 ऑक्टोबर) संध्याकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
दुसरीकडे मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे शीतला माता मंदिराजवळ भरधाव ट्रकने भाविकांच्या गर्दीला चिरडले. या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 29 जण जखमी झाले आहेत.

फोटो स्रोत, ANI
बंगालचे मंत्री म्हणतात, 'असं कधी ना कधी घडतंच असतं'
पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री दिलीप घोष यांनी कोलकातातील चोरबागानमधील दुर्गापूजेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीवर प्रतिक्रिया दिली आहे.
दिलीप घोष यांनी म्हटलं आहे की, आपल्या देशात अनेक धार्मिक स्थळांवर जिथं मोठी गर्दी असते, तिथं कधी ना कधी अशा घटना घडतच असतात.
माध्यमांशी बोलताना घोष म्हणाले की, "जी घटना घडली, ती दुर्दैवी आहे. पण कधी ना कधी असंच घडतंच असतं. प्रत्येक पूजेला लाखो लोक येतात, पण कधीकधी थोड्या निष्काळजीपणामुळे अशा घटना घडतात. असं व्हायला नको. आपल्या देशात, अनेक धार्मिक स्थळांवर जिथं प्रचंड गर्दी असते, तिथं कधी ना कधी अशा घटना घडतात, त्यामुळे आयोजकांनी अधिक काळजी घेतली पाहिजे."

फोटो स्रोत, ANI Video Grab
"सरकारच्या वतीने मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, मुख्य सचिव, पक्षाध्यक्ष आणि मंत्री नेते तिथे पोहोचले आहेत. जखमींच्या उपचाराची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु, अशा घटनेमुळे मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांप्रति माझ्या संवेदना आहेत."
ते म्हणाले की, "पूजा अजूनही सुरू आहे, ती थांबवू नये आणि अशा घटना घडता कामा नयेत."
काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी दिलीप घोष यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे.
सुप्रिया श्रीनेत यांनी 'एक्स'वर लिहिलं आहे की, "हे बंगाल भाजप नेते दिलीप घोष आहेत. चोरबागान दुर्गा पूजा पंडाल अपघातावर ते म्हणत आहेत की, ही घटना खूप दुःखद आहे आणि कधी ना कधी असं घडतच असतं."
पश्चिम बंगालमधील चेंगराचेंगरीवर मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी काय म्हणाले?
मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी घटनेबाबत सांगितलं, "सुरुवातीला 17 जणांचा मृत्यू झाला, तर त्यापाठोपाठ आणखी 2 जणांचा मृत्यू झाला. या घटनेतील 24 जणांवर उपचार सुरू असून सद्यस्थितीत एका जणाची प्रकृती थोडी गंभीर आहे. आम्ही आमचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. गृहमंत्री अमित शाह यांचा कार्यक्रमदेखील रद्द करण्यात आला आहे."
कोलकात्याहून प्रतिनिधी प्रभाकर मणि तिवारी यांनी सांगितलं की, सुवेंदू अधिकारी यांनी घटनेतील मृतांच्या प्रत्येक कुटुंबाला 25 लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे.
तसेच, प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचंही म्हटलं आहे. तर, घटनेतील जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असून त्यांनाही प्रति व्यक्ती 5 लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार असल्यांचं म्हटलं आहे.
या घटनेतील मृतांमध्ये महिला आणि मुलांची संख्या जास्त आहे. या प्रकरणाची चौकशी कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत केली जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
कोलकाता पोलिसांचं एएफएस पथक सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. या प्रकरणात जो कोणी निष्काळजीपणासाठी दोषी आढळेल त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही सांगण्यात आलं आहे.
प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
पश्चिम बंगालमध्ये 58 हजार दुर्गापूजांचे आयोजन करण्यात आले आहे.
चोरबागानमध्ये आयोजित होणाऱ्या दुर्गापूजेला 90 वर्षांहून अधिक काळाची परंपरा आहे. मात्र, यापूर्वी येथे अशा प्रकारची दुर्घटना कधीही घडली नव्हती.
एका स्थानिक व्यक्तीने सांगितलं, "यापूर्वी येथे असे कधीही घडले नव्हते. या पूजेला 91 वर्षे झाली आहेत. अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे पाय घसरून काही लोक पडले."

फोटो स्रोत, ANI
दुर्घटनेतील आणखी एका व्यक्तीने सांगितलं , "तेथे जागा खूपच अरुंद होती. अनेक लोक रांगेत उभे होते. त्या ठिकाणी पूर्ण अंधार होता आणि एकही लाइट लावलेला नव्हता. माझी नात आणि इतर मुलं माझ्यासोबत होती. त्यातील 2 मुलांना रुग्णालयात दाखल केले आहे. मीसुद्धा पडलो होतो. दुर्घटना घडल्यानंतर अर्धा तास तेथे कोणताही पोलीस किंवा कोणताही स्वयंसेवक उपस्थित नव्हता."
एका व्यक्तीने वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना म्हणाला, "मंडपातून बाहेर पडताना चेंगराचेंगरी झाली. तेथे कोणताही स्वयंसेवक उपस्थित नव्हता. कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती."

फोटो स्रोत, ANI
आणखी एका स्थानिक व्यक्तीने सांगितलं की, मुसळधार पाऊस सुरू असतानाच ही दुर्घटना घडली. अनेकांना दुचाकींवर बसवून बाहेर नेले जात होते. यावेळी काही लोक बेशुद्ध झाले होते.
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले, "चोरबागान दुर्गापूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीची घटना समजताच मला मोठा धक्का बसला असून अतिशय दुःख झाले आहे. सर्व जखमी लवकर बरे व्हावेत आणि या कठीण काळात त्यांच्या कुटुंबीयांना धैर्य व बळ मिळावे, अशी आई दुर्गाकडे मी प्रार्थना करते."
पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींकडूनही दुःख व्यक्त
कोलकात्यातील दुर्गापूजा मंडपात झालेल्या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले असून मृतांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेदेखील एका कार्यक्रमासाठी कोलकात्यात आले होते. पावसादरम्यान मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांच्यासोबत ते नागरिकांना अभिवादन करताना दिसले होते.
मात्र, दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला.
अमित शाह यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं, "कोलकात्यातील चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीची अत्यंत दुःखद बातमी नुकतीच समजली. यासंदर्भात मी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे."
"पश्चिम बंगालमधील उद्याचे माझे सर्व कार्यक्रम स्थगित करून मी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेणार आहे. सर्व जखमी लवकर बरे व्हावेत, अशी आई दुर्गाकडे प्रार्थना करतो."

फोटो स्रोत, Getty Images
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एक्सवर लिहिलं, "कोलकात्यातील चोरबागान दुर्गापूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीची बातमी अत्यंत दुःखद आहे. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला असून मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत."
"मृतांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या मनापासून संवेदना आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो. सर्व जखमींना तातडीने उत्तम उपचार मिळतील, याची प्रशासनाने खात्री करावी. तसेच, भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी या घटनेची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी", अशी मागणी त्यांनी केली.

फोटो स्रोत, ANI
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. एक्सवरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले, "कोलकात्यातील चोरबागान दुर्गापूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुःखद घटनेमुळे मला अतिशय दुःख झाले आहे. या दुर्घटनेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबीयांप्रती माझ्या मनापासून संवेदना आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो."
"पश्चिम बंगाल सरकारने तातडीने बचावकार्य आणि वैद्यकीय मदत सुनिश्चित करावी. मृतांच्या व जखमींच्या कुटुंबीयांना पुरेशी भरपाई द्यावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, असे माझे आवाहन आहे."
मध्य प्रदेश : ग्वाल्हेरमध्ये ट्रकने भाविकांना चिरडले; 11 जणांचा मृत्यू
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे शीतला माता मंदिराजवळ भरधाव ट्रकने भाविकांच्या गर्दीला चिरडले. या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 29 जण जखमी झाले आहेत.
शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री सुमारे 1.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींपैकी 5 ते 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
ग्वाल्हेरच्या जिल्हाधिकारी रुचिका चौहान यांनी सांगितलं, "ट्रक चीनोरच्या दिशेने मंदिराकडे येत होता. वाटेत चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक सतत डाव्या बाजूला वळत गेला. याचदरम्यान ट्रकने रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांना धडक देत त्यांना चिरडले आणि शीतला माता मंदिराच्या प्रवेशद्वाराला धडक दिली. त्यामुळे मंदिराची भिंत कोसळली आणि 40 ते 50 लोक ढिगाऱ्याखाली दाबले गेले."

फोटो स्रोत, ANI Video Grab
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, नवरात्रीच्या काळात या रस्त्यावर बॅरिकेड्स आणि पोलिसांची तपासणी चौकीही होती. असे असताना ट्रक मंदिर परिसरात कसा पोहोचला, याची चौकशी केली जात आहे.
ट्रकची तांत्रिक तपासणी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे पथकही घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी ही तपासणी केली जाणार आहे.
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेची चौकशीही केली जात आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)




























