मादुरो यांना पकडण्याच्या मोहिमेची माहिती वापरून अमेरिकन सैनिकाने कोट्यवधी कमावले, आता अटक; नेमकं प्रकरण काय?

    • Author, नार्डिन साद
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

व्हेनेझुएलाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना पकडण्याच्या लष्करी मोहिमेत सहभागी असलेल्या अमेरिकेच्या स्पेशल फोर्सेस म्हणजे विशेष दलातील एका सैनिकाला अटक करण्यात आली आहे.

निकोलस मादुरो यांना पदावरून हटवल्याची माहिती सार्वजनिकरित्या उघड होण्यापूर्वीच या सैनिकानं त्यावर बेटिंग (सट्टेबाजी) केल्याच्या आरोपावरून त्याला अटक करण्यात आली आहे.

या सैनिकाचं नाव गॅनन केन व्हॅन डाईक असं आहे. अमेरिकेच्या न्याय विभागानं गॅननवर गोपनीय माहितीच्या आधारे, पॉलीमार्केट या क्रिप्टोवर आधारित प्लॅटफॉर्मवर बेटिंग किंवा व्यवहार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

"हे स्पष्टपणे इनसायडर ट्रेडिंग आहे आणि फेडरल कायद्यानुसार ते बेकायदेशीर आहे," असं न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

इनसायडर ट्रेडिंग म्हणजे एखाद्या अंतर्गत माहितीचा गैरवापर करून केलेला व्यवहार.

सैनिकाने गोपनीय माहितीचा वापर सट्टेबाजीसाठी कसा केला?

गॅनन केन व्हॅन डाईक हा उत्तर कॅरोलिनामधील फोर्ट ब्रॅग इथे असणाऱ्या अमेरिकेच्या सैन्यात तैनात असलेला सैनिक होता. तो ड्युटीवर होता. त्यानं बेटिंग करून 4 लाख 9 हजार डॉलर्सहून अधिकची (अंदाजे 3 कोटी 85 लाख 60 हजार रुपये) रक्कम जिंकली होती.

अमेरिकेच्या लष्करानं 3 जानेवारीच्या रात्री व्हेनेझुएलामध्ये एक नाट्यमय लष्करी कारवाई केली होती. यात मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना कॅराकसमधील त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना न्यूयॉर्कमध्ये आणण्यात आलं आणि त्यांच्यावर शस्त्रास्त्रं आणि अमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांचे आरोप लावण्यात आले. मात्र त्यांनी हे आरोप नाकारले आहेत.

व्हॅन डाईक यानं कथितरित्या 'ऑपरेशन ॲब्सल्यूट रिझॉल्व्ह' नावानं ओळखल्या जाणाऱ्या या मोहिमेची वेळ आणि त्यातून साध्य केलं जाणारं उद्दिष्टं यावर बेटिंग केली होती.

त्यानं हे बेटिंग 'निव्वळ नफा कमावण्यासाठी' केली होती, असं अमेरिकेच्या न्याय विभागानं गुरुवारी (23 एप्रिल) एका निवेदनात म्हटलं आहे.

अमेरिकेच्या न्याय विभागानं आरोप केला आहे की, 26 डिसेंबर 2025 ला किंवा त्याच सुमारास, व्हॅन डाईकनं पॉलीमार्केटवर एक खातं सुरू केलं. त्यानंतर त्यानं मादुरो आणि व्हेनेझुएलाशी संबंधित बाजारांमध्ये ट्रेडिंग करण्यास सुरुवात केली.

'ऑपरेशन ॲब्सल्यूट रिझॉल्व्ह'बद्दलची गोपनीय आणि अप्रकाशित माहिती व्हॅन डाईककडे असताना त्यानं या माहितीचा गैरवापर करून 33 हजार डॉलरहून (अंदाजे 31 लाख 11 हजार 500 रुपये) अधिक रकमेची बेटिंग किंवा सट्टेबाजी केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

पॉलीमार्केटनं काय सांगितलं?

पॉलीमार्केटनं, गुरुवारी (23 एप्रिल) सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका निवेदनात म्हटलं, "एक युजर सरकारच्या गोपनीय माहितीचा वापर करून ट्रेडिंग करत असल्याचं आमच्या लक्षात आलं. त्यानंतर आम्ही ते प्रकरण न्याय विभागाकडे नेलं आणि त्यांच्या तपासात सहकार्य केलं."

पॉलीमार्केटनं पुढे म्हटलं, "पॉलीमार्केटवर इनसायडर ट्रेडिंगला स्थान नाही. आज झालेली अटक ही व्यवस्था योग्यप्रकारे काम करत असल्याचा पुरावा आहे."

गुरुवारी (23 एप्रिल) सार्वजनिक करण्यात आलेल्या आरोपपत्रानुसार, व्हॅन डाईकवर सरकारच्या गोपनीय माहितीचा वैयक्तिक फायद्यासाठी बेकायदेशीर वापर, अप्रकाशित सरकारी माहितीची चोरी, कमोडिटीज घोटाळा, ईमेल किंवा इंटरनेटसारख्या इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन्सचा वापर करून गुन्हा करणं किंवा पैशाचा गैरव्यवहार करणं (वायर फ्रॉड) आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

गोपनीय माहिती उघड न करण्यासाठीचं जवानांवरील कायदेशीर बंधन

"लष्करी मोहीम शक्य तितक्या सुरक्षितपणे आणि प्रभावीपणे पूर्ण करता यावी यासाठी आपल्या सैन्यातील पुरुष आणि महिला जवानांना गोपनीय माहिती दिली जाते. त्यांनी अशा अत्यंत संवेदनशील माहितीचा वापर वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी करण्यास मनाई आहे," असं अमेरिकेचे कार्यवाहक (ॲक्टिंग) ॲटर्नी जनरल टॉड ब्लँच म्हणाले.

"अंदाज वर्तवणारे बाजार (प्रेडिक्शन मार्केट्स) सहजपणे तुलनेनं अगदी अलीकडेच उपलब्ध झाले आहेत. मात्र राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित माहितीचं रक्षण करणारे फेडरल कायदे त्यावर पूर्णपणे लागू होतात."

न्यूयॉर्कच्या दक्षिण जिल्ह्याचे अमेरिकेचे ॲटर्नी जनरल जे क्लेटन यांनी पुढे सांगितलं की, हे अंदाज वर्तवणारे बाजार "वैयक्तिक फायद्यासाठी गैरवापर केलेल्या गोपनीय माहितीचा वापर करण्याचं आश्रयस्थान नाहीत." न्यूयॉर्कच्या दक्षिण जिल्ह्यामध्येच या प्रकरणाची पुढील कारवाई होणार आहे.

अमेरिकेच्या न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एक सैनिक म्हणून व्हॅन डाईकनं माहिती उघड न करण्याच्या करारांवर सही केली होती. त्यानं वचन दिलं होतं की, "तो लष्करी कारवायांशी संबंधित कोणतीही गोपनीय किंवा संवेदनशील माहिती लेखी, तोंडी, कृती किंवा इतर मार्गानं कधीही उघड करणार नाही किंवा फोडणार नाही किंवा प्रकाशित करणार नाही."

सरकारी (फेडरल) वकीलांनी आरोप केला आहे की, व्हॅन डाईक 8 डिसेंबर 2025 पासून ते किमान 6 जानेवारी 2026 पर्यंत, 'ऑपरेशन ॲब्सल्यूट रिझॉल्व्ह'चं नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात सहभागी होता. त्याच्याकडे या मोहिमेबद्दलची संवेदनशील, अप्रकाशित, गोपनीय माहिती होती.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

कमोडिटी फ्युचर्स ट्रेडिंग कमिशन (सीएफटीसी) ही अमेरिकेतील एक स्वतंत्र फेडरल एजन्सी किंवा संस्था आहे. या एजन्सीनं सांगितलं की, त्यांनीदेखील व्हॅन डाईकविरोधात इनसायडर ट्रेडिंग केल्याच्या आरोपाखाली तक्रार केली आहे.

गुरुवारी (23 एप्रिल) याच्याशी संबंध नसलेल्या एका कार्यक्रमादरम्यान या कथित बेटिंग किंवा सट्टेबाजीबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विचारण्यात आलं. त्यावेळेस ते म्हणाले की, त्यांना याबद्दल माहित नाही. मात्र ते यात लक्ष घालतील.

अंदाज वर्तवणाऱ्या बाजारांमुळे (सट्टेबाजी) इनसायडर ट्रेडिंग होऊ शकतं याबद्दलच्या चिंतेबद्दल विचारलं असता ट्रम्प म्हणाले की, ते "यापैकी कोणत्याही गोष्टीबद्दल खूश नाहीत."

"दुर्दैवानं, संपूर्ण जग काही प्रमाणात एक कॅसिनो बनलं आहे. तुम्ही जगभरात, युरोपात आणि प्रत्येक ठिकाणी काय चाललं आहे हे पाहा. सगळीकडे अशी सट्टेबाजी होते आहे. मी कधीही फारसा याच्या बाजूनं नव्हतो," असं ट्रम्प म्हणाले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)