नाशिकमधील लैंगिक शोषणप्रकरणी टीसीएस कंपनीकडून आरोपी कर्मचाऱ्यांवर कारवाई; निवेदनात काय म्हटलं?

    • Author, प्रवीण ठाकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

नाशिकमधील टीसीएस कंपनीत (टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस) महिला कर्मचाऱ्यांना धमकावून त्यांचा विनयभंग, लैंगिक शोषण आणि मानसिक छळ केल्याचे आरोप याच कंपनीतील आठ महिलांनी केले आहेत.

या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात 8 गुन्हे, तर देवळाली पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये दोन महिला आणि सहा पुरुषांचा समावेश आहे.

या आरोपींपैकी सात जणांना अटक करण्यात आली असून, एक महिला आरोपी फरार आहे.

ज्या कर्मचाऱ्यांना आरोपी म्हणून पोलिसांनी चौकशीसाठी अटक केलीय, त्याचं टीसीएसनं निलंबन केलं आहे. शिवाय, कंपनीची बाजू स्पष्ट करणारं पत्रकही जारी केलं आहे.

पीडित महिलांवर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे पोलिसांचा तपास त्या दिशेनेही सुरू आहे.

आरोपी हे त्याच कंपनीत मोठ्या पदावर आहेत. यातील काही संगणक अभियंते तर काही जण टीम लीडर्स आहेत.

टीसीएस कंपनीचे निवेदन

या प्रकरणात टीसीएस कंपनीने निवेदन जारी केलं आहे.

या निवेदनात टीसीएस कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय की, "आमच्या कंपनीत कोणत्याही प्रकारच्या छळवणूक आणि जुलूमाविरुद्ध दीर्घकालीन शून्य-सहनशीलता धोरण आहे. आम्ही नेहमीच आमच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यस्थळी सुरक्षितता, सन्मान आणि कल्याणाच्या सर्वोच्च मानकांची खात्री केली आहे."

"नाशिकमधील या प्रकरणाची माहिती मिळताच आम्ही तात्काळ कारवाई केली असून अंतर्गत चौकशी प्रक्रिया सुरू केली आहे. तपासाअंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे."

शॉर्ट व्हीडिओ पाहा

तसंच, "आम्ही स्थानिक कायदा अंमलबजावणी प्राधिकरणांसोबत पूर्ण सहकार्य करत आहोत. पुढील कोणतीही कारवाई या तपासाच्या निष्कर्षांवर आधारित असेल", असंही कंपनीच्या प्रवक्त्यांनी नमूद केलं आहे.

HR विरोधातही गुन्हा दाखल

पीडित महिलांनी टीसीएस कंपनीच्या एचआर विभागाकडेही याबाबत तक्रार केली होती. परंतु, एचआर विभागाने याप्रकरणी काहीच कार्यवाही केली नाही, असं महिलांनी तक्रारीत म्हटलंय.

त्यामुळं टीसीएस कंपनीच्या पुणे येथील एचआर विभागातील महिला कर्मचाऱ्याविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.

"कामाच्या ठिकाणी आरोपी पीडित महिलांना शारीरिक स्पर्श करणे, त्यांच्या शारीरिक स्थितीवर आणि पेहरावावर भाष्य करणे, त्यांच्या धर्माविषयी शेरेबाजी करणे यासह धार्मिक भावना दुखावण्याचे प्रकार करत होते," असे आरोप महिलांनी तक्रारीतून केले आहेत.

त्याचबरोबर, "आरोपी जबरदस्तीने मासांहार करायला सांगत होते, धर्मांतर करण्यासाठी त्यांची मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न करत होते," असंही तक्रारीत म्हटलं आहे.

2022 पासून हा प्रकार सुरू होता, असं तक्रारदार महिलांनी पोलिसांना सांगितलं आहे.

पोलीस या सर्व आरोपांचा तांत्रिक आणि प्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारे तपास करत आहेत.

9 एफआयआरमध्ये काय तक्रारी

एफआयआर - 01 : जुलै 2022 ते फेब्रुवारी 2026 या काळात वडाळा रोडवरील या कंपनीत तीन आरोपींनी एका महिला कर्मचाऱ्याच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. महिलेला धमकावून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले तसंच ऑफिसच्या लॉबीमध्ये तिच्यासोबत छेडछाड केली, असेही आरोप आहेत.

एफआयआर - 02 : मे 2023 ते 19 मार्च 2026 या काळात आणखी दोन आरोपींविरोधात त्याच महिलेची छेड काढल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची तिने कंपनीच्या एचआर विभागात तोंडी तक्रार केली. मात्र एचआरमधील अधिकाऱ्यांनीही त्या दोघांच्या वर्तनाला प्रोत्साहन दिले.

एफआयआर - 03 : 2022 ते फेब्रुवारी 2026 या काळात आणखी एका आरोपीने एका मीटिंगमध्ये त्या महिलेला पाहिलं आणि तिच्या वैयक्तिक व वैवाहिक आयुष्याबद्दल, विशेषतः तिला मूल नसल्याबद्दल, अपमानास्पदरित्या कमेंट केली. तसेच त्याने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

एफआयआर - 04 : मे ते डिसेंबर 2025 या काळात पुन्हा एका आरोपीने महिलेला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लाजिरवाणे प्रश्न विचारले आणि तिच्या शरीराकडे पाहून, खासगी भागांकडे इशारा केला. तसेच धर्माबद्दल बोलून इतर महिलांच्या धार्मिक भावना दुखावल्या.

एफआयआर - 05 : 2022 ते 23 मार्च 2026 या काळात संशयित आरोपींनी तरुणाला त्याच्या धर्मातील देवाबद्दल अपशब्द वापरले आणि त्याला एका विशिष्ट धर्माचे धार्मिक विधी जबरदस्तीने करण्यास भाग पाडले. त्याला बळजबरी मांसाहार खाऊ घातला आणि त्याचा धर्म बदलण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी त्याच्या धर्मातील महिलांबद्दलही अपशब्द वापरले.

एफआयआर - 06 : फेब्रुवारी 2024 ते 2026 या काळात संशयित आरोपींनी त्या महिलेच्या शरीराबद्दल अपमानास्पद आणि अश्लील भाष्य केले. त्यांनी जाणूनबुजून तिच्या शरीराला आणि पायांना स्पर्श करून तिची छेड काढली.

एफआयआर - 07 : जून 2025 ते मार्च 2026 या काळात पाच संशयित आरोपींनी महिलेचा पाठलाग करुन तिच्याबद्दल अश्लील भाष्य केले. कामाच्या ठिकाणी त्यांनी तिच्या शरीराला अयोग्य पद्धतीने स्पर्श केला आणि तिच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

एफआयआर - 08 : जानेवारी 2025 ते एप्रिल 2026 या काळात आरोपींनी महिलेला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारले आणि प्रेमाची मागणी केली. तसेच त्यांनी वारंवार अश्लील भाषा वापरून तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला, असेही आरोप आहेत.

एफआयआर - 09 : जानेवारी ते 1 एप्रिल 2026 या काळात दोन आरोपींनी कामाच्या ठिकाणी त्या महिलेसोबत अपशब्द वापरले आणि तिच्याशी गैरवर्तन केले. तसेच त्यांनी तिच्या शरीराबद्दल अपमानास्पद आणि अश्लील कमेंट केल्याचा आरोप आहे.

या वेगवेगळ्या वेळी झालेल्या एफआयआर असून काहीमधील आरोपी सारखेच आहेत तर काहींमधील आरोपी वेगळे आहेत.

विशेष तपास पथकाची नेमणूक

या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या नेतृत्त्वाखाली विशेष तपास पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. यात 12 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी 10 एप्रिल रोजी प्रतिक्रिया दिली. त्यांनी खासगी कंपन्यांना महिलांच्या सुरक्षितेसंदर्भात आवश्यक ती खबरदारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन केले.

सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके 10 एप्रिलच्या या प्रतिक्रियेत म्हणाले की, "या कंपनीमध्ये महिलांचा विनयभंग, लैंगिक व मानसिक अत्याचार तसेच धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी 9 गुन्हे दाखल करण्यात आले असून 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे."

"या प्रकरणाचं गांभीर्य आणि संवेदनशीलता पाहून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त यांच्या नेतृत्त्वाखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे."

तसंच, त्यांनी आवाहन केलं की, "कोणत्याही महिलेला विनयभंग किंवा अत्याचाराची तक्रार करायची असेल तर त्यांनी सीपी व्हॉट्सअप क्रमांक 9923323311 यावर संदेश पाठवावा किंवा नियंत्रण कक्ष क्रमांक 112 वर संपर्क साधावा."

आरोपींचे वकील काय म्हणाले?

याबाबत आरोपींचे वकील बाबा सय्यद यांनी 10 एप्रिलला त्यांची भूमिका मांडली.

ते म्हणाले की, "सर्वजण कंपनीत एकत्र काम करत होते. ओपन केबिन ऑफिस स्पेस कल्चर असल्यामुळे सर्वांमध्ये चांगली मैत्री होती. त्यामुळे तक्रारदार महिला आणि आरोपींमध्ये गैरसमज झाला आहे."

"हे प्रकरण अतिशय संवेदनशील आहे. संपूर्ण एफआयआरची प्रत अद्याप मिळालेली नाही. भारतीय न्यायसंहितेनुसार (बीएनएस) जी कलमे लावण्यात आली आहेत. त्यासाठी कमाल 3 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. एफआयआर पाहिल्यानंतर धर्मांतराच्या मुद्द्यावर स्पष्टता येईल."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)