डासांमुळे अख्खं गाव झालं त्रस्त, 'गावात लग्नासाठी मुलगी द्यायला कुणी तयार नाही'

डास आणि गावाची गोष्ट
फोटो कॅप्शन, गावकरी
वाचन वेळ: 4 मिनिटे

गुजरातमधील राजकोटजवळच्या वेजागावची ही कहाणी आहे. डासांमुळे एखादं गाव कसं जेरीला येतं आणि तिथे कशी गंभीर परिस्थिती निर्माण होते, याचं उदाहरण म्हणजे हे वेजागाव.

वेजागावाला सध्या जी समस्या भेडसावते आहे, ती काहीशी विचित्र वाटू शकेल. मात्र ती तितकीच गंभीर आहे. या गावात डासांपासून असणारा धोका इतका वाढला आहे की गावकरी हे कायम मच्छरदाणी खाली राहत आहेत.

इतकंच नाही तर गावातील गुरंढोरांनादेखील मच्छरदाणीत ठेवावं लागत आहे. डासांच्या समस्येमुळे इथे तरुणांच्या लग्नामध्येही अडचणी येत आहेत.

'कोणीही लग्नासाठी मुलगी देत नाही'

कांजीभाई हिराभाई हे वेजागावचे रहिवासी आहेत. ते म्हणतात, "आमच्या गावात लग्नासाठी मुलगी द्यायला कोणीही तयार नाही. आमच्या गावात कोणतेही पाहुणे रात्रीच्या वेळेस मुक्काम करत नाहीत. जरी पाहुणे-नातेवाईक आले, तरी ते फक्त दिवसभर थांबतात आणि संध्याकाळी 5 वाजेच्या आधी गावातून निघून जातात."

कांजीभाई हिराभाई पुढे म्हणाले, "आम्ही आता याला कंटाळलो आहोत. या संकटातून कृपया आमची सुटका करा. या डासांच्या समस्येला आम्ही खूपच वैतागलो आहोत."

डास आणि गावाची गोष्ट

कुंवरबेन वेजागावातील शेतकरी असून त्यांचा दुग्ध व्यवसाय आहे. त्यांच्याकडे गुरंढोरं आहेत. त्या म्हणतात, "आमच्या गावात मच्छरदाणी असणं ही अत्यावश्यक बाब आहे. त्याशिवाय आम्ही राहूच शकत नाही. मच्छरदाणी नसेल तर रात्रभर डास चावत राहतात, हैराण करून सोडतात."

"डासांच्या उपद्रवामुळे आम्हाला मच्छरदाण्या सतत लावून ठेवाव्या लागतात. आम्हाला डासांचा प्रचंड त्रास आहे. गेल्या 7-8 वर्षांपासून या परिस्थितीत मी राहते आहे."

विक्रम दाभी हे वेजागावचे आणखी एक दुग्धव्यवसाय करणारे रहिवासी आहेत. ते म्हणाले, "इथे गावात सर्वत्र डास आहेत. संध्याकाळ होताच, डासांच्या झुंडी इथं फिरू लागतात. ही एक खूप मोठी समस्या आणि उपद्रव आहे."

नातेवाईकदेखील रात्री मुक्काम करत नाहीत

अगदी या गावात जर कोणाकडे पाहुणे-नातेवाईक आले, तरी ते इथे मुक्कामी राहत नाहीत. डासांच्या त्रासामुळे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही पाहुणे मंडळी गावातून निघून जातात. डासांमुळे दुभत्या जनावरांवर देखील परिणाम झाला असून दुधाचं उत्पादन घटलं आहे.

डास आणि गावाची गोष्ट

कांजीभाई हिराभाई सांगतात "गावातील लोकांना कोणताही व्यवसाय उपलब्ध नाही. इथे पाण्याचीही मोठी समस्या आहे. इथे डासांचा प्रचंड त्रास आहे. अशा परिस्थितीत आम्ही काय करायचं? आमची मुलं डासांमुळे सतत आजारी पडत असतात. आम्ही जे काही उत्पन्न मिळवतो, त्यातील बहुतांश भाग औषधोपचारांमध्येच खर्च होतो. आम्हाला सतत औषधं विकत घ्यावी लागतात."

गुरंढोरंदेखील त्रस्त, उत्पन्न घटलं आणि दर 6 महिन्यांनी नवीन मच्छरदाण्या बसवण्याची वेळ

गावात फक्त माणसांनाच डासांचा त्रास नाही. तर गुरंढोरंदेखील त्रासांच्या समस्येमुळे त्रस्त झाली आहेत.

वेजागावचे रहिवासी असलेले, विक्रम दाभी म्हणाले, "माझ्याकडे 30 म्हशी आहेत. त्यापैकी 10 म्हशी मी देऊन टाकल्या. आता माझ्याकडे फक्त 20 म्हशी आहेत. अडचण अशी आहे की इतकी जनावरं तुम्ही कुठे ठेवणार? इतक्या जनावरांसाठी मच्छरदाण्या लावणे खूपच कठीण आहे."

डास आणि गावाची गोष्ट

किरणबेन यांचा दुग्धव्यवसाय आहे. त्या म्हणाल्या, "इथे माणसांबरोबर जनावरांसाठीदेखील मच्छरदाण्या लावणं बंधनकारक आहे. नाहीतर डासांच्या त्रासापुढे गुरंढोरं तग धरू शकणार नाहीत. मच्छरदाण्या लावण्याव्यतिरिक्त, आम्ही इतरही व्यवस्था करतो. नाहीतर जनावरं जगू शकत नाहीत."

"डासांच्या उपद्रवाचा दूधाच्या उत्पादनावर थेट परिणाम होतोय," असं किरणेबन सांगतात.

कांजीभाई यांच्याकडेही गुरंढोरं आहेत. ते म्हणाले, "डासांमुळे आम्हाला जनावरांचं दूध काढणंदेखील शक्य होत नाही. डासांच्या समस्येचा परिणाम दुधाच्या उत्पादन देखील होतो आहे. प्रचंड मेहनत घेऊनही, आम्हाला जेमतेमच पैशांची बचत करता येते. इथे दर 6 महिन्यांनी नवीन मच्छरदाण्या बसवाव्या लागतात. कारण उष्णता आणि पाण्यामुळे मच्छरदाण्या खराब होतात."

डासांच्या समस्येचं मूळ कशात?

गावातील नदीमध्ये या डासांच्या समस्येचं मूळ आहे. नदीतील दूषित पाण्यामुळे आणि पाण्यात वाढलेल्या जलपर्णीमुळे डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे.

डास आणि गावाची गोष्ट

योगेंद्रसिंह जडेजा वेजागावचे सरपंच आहेत. डासांची समस्या नेमकी कशामुळे निर्माण झाली आहे, याबद्दल ते म्हणाले, "शहरी भागातून गावच्या नदीमध्ये दूषित पाणी येतं आहे. त्यामुळे नदीच्या पाण्यात जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या जलपर्णींमुळेच डासांचा प्रचंड उपद्रव निर्माण झाला आहे. इथे संध्याकाळी 5 वाजेनंतर बसणंही अशक्य झालं आहे."

"प्रवास करतानाही अडचणी येतात. लहान मुलं, जनावरं आणि रहिवाशांना यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे."

गावकऱ्यांकडून प्रशासनाकडे तक्रार, मात्र अद्याप उपाययोजना नाही

वेजा गावच्या रहिवाशांचा आरोप आहे की त्यांनी प्रशासनाकडे अनेकदा निवेदनं दिली आहेत. मात्र डासांच्या समस्येवर अजूनही कोणतीही उपाययोजना झालेली नाही.

वेजागावचे सरपंच, योगेंद्रसिंह जडेजा म्हणाले, आमचं गाव राजकोट अर्बन डेव्हलपमेंट ऑथोरिटीच्या (आरयूडीए) अखत्यारीत येतं. डासांच्या समस्येबाबत आम्ही तिथेदेखील निवेदन दिलं आहे.

तसंच आम्ही जिल्हा पंचायतीच्या आरोग्य विभागाकडेही निवेदन दिलं आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी साधी पावडर घेऊन येतात. ते 5-10 किलो साधी पावडर शिंपडतात आणि निघून जातात. मात्र पाण्यात असलेल्या जलपर्णी काढून टाकण्यासाठी कोणतीही पावलं उचलली जात नाहीत. या जलपर्णींमुळे डासांची समस्या निर्माण झाली आहे.

डास आणि गावाची गोष्ट

प्रशासन काय म्हणतं?

आम्ही राजकोट अर्बन डेव्हलपमेंट ऑथोरिटीच्या एका अधिकाऱ्याची भेट घेतली. त्यांचं म्हणणं आहे की ही बाब त्यांच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. तर दुसऱ्या बाजूला आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशीही बोललो. त्यांचंही म्हणणं आहे की ही समस्या त्यांच्या अधिकारक्षेत्रात येत नाही.

यासंदर्भात गावकऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांचं अर्धे गाव राजकोट अर्बन डेव्हलपमेंट ऑथोरिटीअंतर्गत येतं, तर अर्धे गाव महानगरपालिकेच्या कक्षेत येतं. मग आता ही समस्या नेमकं कोण सोडवणार?

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.