सोनम वांगचूक यांना हटवल्यानंतर जंतरमंतरवर उपोषणाला बसलेले विद्यार्थी कोण आहेत? जाणून घ्या

मनीष, नेहा आणि अमीन (डावीकडून उजवीकडे) 28 जूनपासून जंतर मंतरवर उपोषणाला बसले आहेत. हा फोटो 14 जूनचा आहे.

फोटो स्रोत, Shubh Rana

फोटो कॅप्शन, मनीष, नेहा आणि अमीन (डावीकडून उजवीकडे) 28 जूनपासून जंतर मंतरवर उपोषणाला बसले आहेत. हा फोटो 14 जूनचा आहे.
Published
वाचन वेळ: 6 मिनिटे

मागील 20 दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतर येथे आमरण उपोषणाला बसलेले पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना आज (18 जुलै) सकाळच्या सुमारास दिल्ली पोलिसांनी आंदोलनस्थळावरून हटवून सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं.

यानंतर कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी)चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे.

सोनम वांगचूक यांनी 28 जूनपासून आपल्या मागण्यांसाठी जंतर-मंतरवर उपोषण पुकारलं होतं. त्यात आज त्यांच्या उपोषणाचा 21 वा दिवस होता.

सोनम वांगचूक यांना जंतरमंतरवरून हटवलं असलं, तरी अद्यापही 3 विद्यार्थी तेथेच उपोषण करत आहेत. त्यांनीही 28 जूनपासून जंतरमंतरवर उपोषणाला सुरुवात केलेली आहे. ते सीजेपीच्या मागण्यांना पाठिंबा देत आहेत. हे तीन विद्यार्थी कोण आहेत जाणून घेऊया.

वांगचूक यांच्यासह उपोषणाला बसणारे ते विद्यार्थी कोण?

नेहा –

27 वर्षीय नेहा उत्तराखंडची रहिवासी आहे. ती जेएनयूमध्ये थिएटर अँड परफॉर्मिंग स्टडीज विषयात पीएचडी करत आहे. 2018 पासून ती एआयएसएशी जोडलेली आहे.

तीदेखील सुरुवातीपासून सोनम वांगचूक यांच्यासह उपोषणाला बसलेली आहे.

बीबीसीशी बोलताना नेहा म्हणाली, "सोनम वांगचूक या आंदोलनाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. त्यांनाच हटवलं तर आंदोलन कसं होणार? आम्ही आमचं काम केलं आहे. अनेक तरुण जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत."

नेहा 28 जूनपासून जंतर मंतरवर उपोषणाला बसली आहे.

फोटो स्रोत, Shubh Rana

फोटो कॅप्शन, नेहा 28 जूनपासून जंतर मंतरवर उपोषणाला बसली आहे.

"सोनम सरांना ज्या पद्धतीने येथून हटवत ताब्यात घेण्यात आलं, ते पाहता आम्ही इथून एक इंचही हलणार नाही. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशात विद्यार्थ्यांचा उल्लेख नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला हटवत ताब्यात घेतलं तर ते बेकायदेशीर ठरेल," असं मत नेहाने व्यक्त केलं.

मनीष -

उपोषणावर असलेला दुसरा विद्यार्थी मनीष कुमार उत्तर प्रदेशातील आझमगढचा रहिवासी आहे.

तो एआयएसएचा उत्तर प्रदेश अध्यक्ष आहे. तो गेल्या 10 वर्षांपासून एआयएसए संघटनेशी जोडलेला आहे. सध्या तो इलाहाबाद विद्यापीठात राज्यशास्त्र विषयात पीएचडी करत आहे.

मनीषने सांगितलं की, 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्याचा त्यांचा निर्णय कायम आहे.

फोटो स्रोत, Shubh Rana

फोटो कॅप्शन, मनीषने सांगितलं की, 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्याचा त्यांचा निर्णय कायम आहे.

मनीष कुमार बीबीसीशी बोलताना म्हणाला, "आज आमच्या उपोषणाचा 21 वा दिवस आहे. आम्ही 20 जुलैला संसदेवर मोर्चा काढणार आहोत. जोपर्यंत हे सरकार जबाबदारी स्वीकारत नाही आणि धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील."

आमीन -

आमीन हा एआयएसएचा उपोषणाला बसलेला तिसरा सदस्य आहेत.

तो म्हणाला, "धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आम्ही इथे बसलो आहोत. सरकारची जबाबदारी निश्चित व्हावी आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणावर (NEP) प्रश्न उपस्थित व्हावेत, यासाठी आमचं आंदोलन सुरू आहे."

याच आठवड्यात बीबीसीशी झालेल्या संभाषणादरम्यान त्याने आरोप केला होता की, राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) हे शिक्षणाच्या खासगीकरणाचा मार्ग मोकळा करणारे आहे.

नेहा, अमीन आणि मनीष (डावीकडून उजवीकडे) यांनी उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं सांगितलं. (फाइल फोटो).

फोटो स्रोत, Shubh Rana

फोटो कॅप्शन, नेहा, अमीन आणि मनीष (डावीकडून उजवीकडे) यांनी उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं सांगितलं. (फाइल फोटो).

बीबीसी प्रतिनिधी शुभ राणा यांच्या माहितीनुसार, एआयएसएचे सदस्य सीजेपीच्या आंदोलनात सहभागी असले आणि उपोषणावर बसले असले, तरी त्यांचा मंच आणि तंबू सोनम वांगचूक यांच्या मंच आणि तंबूपासून वेगळा ठेवण्यात आला आहे.

सीजेपी आणि सोनम वांगचूक यांच्या मागण्या काय?

सोनम वांगचूक यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी जंतर-मंतरवरील आंदोलनात सहभाग घेतला आणि तिथेच आमरण उपोषण सुरू केलं.

सीजेपीची मागणी आहे की, परीक्षा पेपरफुटी प्रकरणासह शिक्षण व्यवस्थेतील इतर अनेक कथित अनियमिततांसाठीची जबाबदारी निश्चित करावी. तसेच, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा.

सीजेपीने असंही म्हटलं की, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना पदावरून काढून टाकावं.

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवर आंदोलन सुरू आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवर आंदोलन सुरू आहे.

सीजेपीच्या आंदोलनाला आणि सोनम वांगचूक यांच्या मागण्यांना अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे. अनेकजण जंतरमंतरवर आंदोलनात सहभागी झाले आहेत.

यामध्ये विविध विद्यार्थी संघटनांच्या सदस्यांचाही समावेश आहे. त्यापैकी काही विद्यार्थ्यांनी सोनम वांगचूक यांच्यासोबत उपोषणही सुरू केलं.

आंदोलकांनी 20 जुलैला संसदेच्या दिशेने मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, शुक्रवारी (17 जुलै) उशिरा रात्री सोनम वांगचूक यांनी सोशल मीडियावर एक व्हीडिओ संदेश जारी करून आपल्या प्रकृतीबाबत आणि आंदोलनाबाबत माहिती दिली होती.

"20 जुलैच्या मोर्चात सहभागी व्हा. तुमची संख्या हीच आमची खरी ताकद आहे. मी एकटा, उपाशी आणि एक सामान्य माणूस आहे. खरी ताकद तुमच्या हातात आहे. आम्ही फक्त विद्यार्थ्यांच्या उत्तरदायित्वाची मागणी करत आहोत."

सोनम वांगचूक यांना जंतरमंतर येथून हटवल्यावर राहुल गांधी काय म्हणाले?

या प्रकरणावर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले, "मोदी सरकारच्या मुख्य तत्त्वांमध्ये असत्य आणि हिंसा यांचा समावेश आहे. सोनम वांगचुक जी अहिंसक उपोषणावर असताना त्यांना जंतरमंतरवरून हटवणे चुकीचे आहे."

राहुल गांधी

फोटो स्रोत, Getty Images

"पेपर लीक, शिक्षणाचा वाढता खर्च आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हे भारताच्या भविष्यासाठी गंभीर प्रश्न आहेत. कोणतीही शक्ती भारताच्या विद्यार्थ्यांना आणि आपल्यापैकी जे त्यांच्यावर प्रेम करतात व त्यांच्यावर विश्वास ठेवतात, त्यांना हे मुद्दे उपस्थित करण्यापासून रोखू शकत नाही. दडपशाहीने प्रश्न मिटणार नाहीत," असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं.

कोर्टानं सरकारकडून मागितलं होतं उत्तर

दिल्ली हायकोर्टाने बुधवारी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांचा 'जीव वाचवण्यासाठी सरकारकडून तातडीनं दखल' घेण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर केंद्र आणि दिल्ली सरकारकडून उत्तर मागितलं होतं.

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत वांगचूक दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषणाला बसले होते.

कायदेशीर बातम्या आणि विश्लेषणाचे वार्तांकन करणाऱ्या 'बार अँड बेंच' या संकेतस्थळाच्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्ते आणि वकील राकेश कुमार सैनी यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती.

सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची तपासणी करताना डॉक्टर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची तपासणी करताना डॉक्टर

सैनी यांनी म्हटलं होतं, "एक सामाजिक आणि मानवाधिकार कार्यकर्ता आपल्या मूलभूत अधिकारांचा वापर करत, सरकारच्या अत्यंत अलोकप्रिय आणि सर्वत्र टीका होत असलेल्या निर्णयांच्या विरोधात आंदोलन करत आहे. एका अर्थाने, तो संपूर्ण राष्ट्रासमोर स्वतःचे प्राण पणाला लावत आहे."

न्यायालयानं सांगितलं होतं की, या प्रकरणाचं गांभीर्य आणि तातडीने सुनावणीची आवश्यकता लक्षात घेऊन या याचिकेवर गुरुवार, 16 जुलै रोजी सुनावणी केली जाईल.

उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटलं होतं, "केंद्र सरकारच्या वतीने कुणीही उपस्थित नाही. आम्ही या याचिकेवर सुनावणी करत आहोत. आम्ही हे प्रकरण उद्यासाठी सूचीबद्ध करू आणि केंद्र सरकारकडून सूचना मागवू."

सफदरजंग रुग्णालयानं वांगचूक यांच्या आरोग्याबाबत काय माहिती दिली?

सोनम वांगचूक यांना सफदरजंग रुग्णालयात नेल्यानंतर त्यांच्या तब्येतीची माहिती रुग्णालयानं दिली आहे. रुग्णालयाने दुपारी 3.30 वाजता सोनम वांगचुक यांचा आरोग्य अहवाल जारी केला.

सोनम वांगचुक यांनी सलाईन (ड्रिप) तसेच तोंडावाटे कोणत्याही प्रकारचे द्रवपदार्थ घेण्यास नकार दिला असल्याचं रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी जारी केलेल्या बुलेटिनमधून सांगण्यात आलं आहे.

सफदरजंग रुग्णालयाने म्हटलं की, सोनम वांगचुक यांची नाडी, रक्तदाब आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळी (ऑक्सिजन सॅच्युरेशन) स्थिर आहे. मात्र, त्यांच्या शरीरात पाण्याची पातळी कमी झाल्याची (डिहायड्रेशन) लक्षणं आढळून आली आहेत.

त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वोत्तम उपचार मिळावेत यासाठी त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवलं जात असून त्यांना योग्य वैद्यकीय समुपदेशनही केलं जात असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे.

सोनम वांगचूक

फोटो स्रोत, Getty Images

सोनम वांगचूक यांना जंतरमंतर येथून हलवून सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर अभिजीत दिपके यांनी आपण उपोषणाला सुरुवात करत आहोत, अशी घोषणा केली आहे.

'मी या क्षणापासून बेमुदत उपोषणाला सुरुवात करत आहे', असं त्यांनी एक्सवर जाहीर केलं.

दरम्यान, जंतर-मंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आंदोलनस्थळावरून आंदोलकांना हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली.

दुपारी अभिजीत दिपके यांच्यावर एका महिलेने शाई फेकल्याने आंदोलनस्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अभिजीत दिपके उपस्थितांसमोर बोलत असताना अचानक ही घटना घडली.

शाई फेकल्यानंतर दिपके यांचे समर्थक तातडीने मंचाकडे धावले. त्यामुळे घटनास्थळी काही काळ गोंधळ आणि धावपळीचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्यावर निळ्या रंगाची शाई फेकण्यात आली होती.

या प्रकारानंतर अभिजीत दिपके यांनी निळ्या शाईला उद्देशून एक्सवर पोस्ट करत म्हटलं, "निळा हा माझा रंग आहे, जय भीम!"

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)