व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार का? 'व्हॉट्सअ‍ॅप प्लस'बद्दल जाणून घ्या सर्वकाही

व्हॉट्सॲप वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार का? व्हॉट्सॲपनं दिलं 'हे' स्पष्टीकरण

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

व्हॉट्सॲपची मालकी असलेल्या मेटा या कंपनीनं एक नवीन फीचर किंवा सुविधा आणली आहे. त्यानुसार व्हॉट्सॲपचा वापर करणाऱ्यांना पैसे मोजून अतिरिक्त सेवा घेता येतील.

कंपनीनं केलेल्या अधिकृत घोषणेनुसार, 'व्हॉट्सॲप प्लस' या नावाखाली या सेवा पुरवल्या जाणार आहेत. त्यांचा समावेश 'मेटावन' प्रोग्रॅमअंतर्गत असणार आहे.

कंपनीच्या या घोषणेनुसार, व्हॉट्सॲपप्रमाणेच मेटा कंपनीची इन्स्टाग्राम आणि फेसबुक ही इतर उत्पादनंदेखील 'इन्स्टाग्राम प्लस' आणि 'फेसबुक प्लस' या सेवा सादर करत आहेत.

'वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू' या वेबसाईटच्या अहवालानुसार, भारतात 85 कोटींहून अधिक (जवळपास 85.38 कोटी) व्हॉट्सॲप अकाउंट आहेत.

तसंच, भारत ही मेटा कंपनीची सर्वात मोठी बाजारपेठसुद्धा आहे.

सोशल मीडियावर अशा आशयाच्या बातम्या फिरत आहेत की आता व्हॉट्सॲप त्यांची सेवा वापरण्यासाठी शुल्क आकारू शकतं. यासंदर्भात, ही नवीन सेवा काय आहे? त्यामध्ये मेसेज पाठवण्यासाठी शुल्क आकारलं जाईल का? ही सेवा कोणाला लागू असणार आहे? या नव्या सेवेमध्ये कोणती वैशिष्ट्यं असणार आहेत? याबद्दल जाणून घेऊया.

मेटा कंपनीच्या उत्पादनं प्रमुख (प्रोडक्ट हेड) नाओमी क्लाईड यांनी काही दिवसांपूर्वी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे मेटा वनशी संबंधित घोषणा केली होती.

फॅक्ट-चेकिंग तज्ज्ञ मुरलीकृष्णन बीबीसीला म्हणाले, "जगभरात सुरू केल्या जाणाऱ्या सेवा टप्प्याटप्प्यानं भारतातील युजर्ससाठी उपलब्ध होतील. प्रत्येक देशाचे काही विशिष्ट स्थानिक कायदे आणि आवश्यकता असतात. त्यानुसार, या सेवांमधील वैशिष्ट्यं वेगवेगळी असू शकतात आणि प्रदेशानुसार ती अपडेट केली जाऊ शकतात."

"आतापर्यंत फक्त बेसिक वैशिष्ट्यांचीच घोषणा करण्यात आली आहे. व्हॉट्सॲपवर सध्या जाहिराती असतात. या नवीन सबस्क्रिप्शनवर आधारित सेवांमध्ये या जाहिराती काढून टाकल्या जाणार की नाही, हे पाहावं लागेल," असं ते म्हणाले.

'व्हॉट्सॲप प्लस' काय आहे?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

व्हॉट्सॲपच्या ॲपमध्ये आधीच अनेक अतिरिक्त फीचर्स किंवा वैशिष्ट्यं उपलब्ध आहेत. मेटाचं म्हणणं आहे की ही सेवा टप्प्याटप्प्यानं सुरू केली जात असल्यामुळे काही वैशिष्ट्यं किंवा सुविधा नंतर उपलब्ध होऊ शकतात.

या सेवेसाठी काय अटी आहेत?

या सेवा फक्त मोबाईल फोनमधील व्हॉट्सॲप मेसेंजर या ॲपद्वारेच सबस्क्राईब करता येणार आहेत. कॉम्प्युटर किंवा मोबाईलच्या ब्राऊझरवर या नवीन सेवांचं सबस्क्रिप्शन घेता येणार नाही. 'व्हॉट्सॲप प्लस' ही सेवा व्हॉट्सॲप बिझनेस ॲप्स आणि अकाउंट्ससाठी उपलब्ध नाही.

तसंच एका व्हॉट्सॲप अकाउंटसाठी तुम्हाला 'व्हॉट्सॲप प्लस'चं फक्त एकच सबस्क्रिप्शन घेता येणार आहे.

'व्हॉट्सॲप प्लस' घेण्यासाठीच्या बेसिक आवश्यकता काय आहेत? एखादं नवीन वैशिष्ट्यं उपलब्ध झालं आहे की नाही, हे कसं समजेल किंवा कुठे पाहता येईल?

ज्या देशात 'व्हॉट्सॲप प्लस'ची सेवा सुरू केली जात आहे त्या देशातील स्थानिक मोबाईल क्रमांक तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तसंच तुमचं व्हॉट्सॲपचं अकाउंट सक्रिय असणं आवश्यक आहे.

व्हॉट्सॲपच्या सेटिंग्समध्ये जा आणि सबस्क्रिप्शन्स हा पर्याय पाहा. तिथे गेल्यावर तुम्ही 'व्हॉट्सॲप प्लस'ची सेवा सबस्क्राईब करू शकता.

सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही व्हॉट्सॲपच्या सेटिंग्समध्ये सबस्क्रिप्शनवर जाऊन आणि त्यात व्हॉट्सॲप प्लसवर जाऊन त्यावरील फीचर्सचं व्यवस्थापन करू शकता. (WhatsApp Settings ----> Subscription ----> WhatsApp Plus)

ही सेवा कोणासाठी योग्य आहे?

नवीन सेवा व्हॉट्सॲपच्या सर्व युजर्ससाठी उपलब्ध आहे. मेसेजिंगसारख्या व्हॉट्सॲपच्या बेसिक सेवांसाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही.

त्याऐवजी ज्यांना काहीतरी अतिरिक्त आणि विशेष असे फीचर्स हवे असतील ते ही सेवा घेऊ शकतात.

'व्हॉट्सॲप प्लस' सेवेसाठीचं शुल्क किती आहे? ते कशाप्रकारे आकारलं जाईल?

या नव्या सेवेसाठी अद्याप कोणतंही शुल्क जाहीर करण्यात आलेलं नाही. ही सेवा अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे. त्यामुळे त्यासाठी आकारलं जाणारं शुल्क प्रत्येक देशासाठी वेगवेगळं असू शकतं.

'व्हॉट्सॲप प्लस'चं शुल्क मासिक स्वरुपाचं आहे. ते ऑटो रिन्युअलद्वारे आकारलं जातं. ज्या तारखेला तुम्ही व्हॉट्सॲपचं सबस्क्रिप्शन घेतलं असेल, दर महिन्याला त्याच तारखेला तुमच्याकडून शुल्क आकारलं जाईल.

'व्हॉट्सॲप प्लस' सेवेसाठीचं शुल्क किती आहे? ते कशाप्रकारे आकारलं जाईल?

फोटो स्रोत, Getty Images

समजा जरी तुम्ही तुमचं सबस्क्रिप्शन मुदतीच्या आधीच रद्द केलं, तरीदेखील सबस्क्रिप्शनचा कालावधी किंवा मुदत संपेपर्यंत तुम्हाला त्यातील फीचर्सचा वापर करता येईल. जर तुमचं सबस्क्रिप्शन योग्यप्रकारे रिन्यू झालं नाही, तर 'व्हॉट्सॲप प्लस'ची सेवा बंद होईल.

जर तुम्हाला तुमचं 'व्हॉट्सॲप प्लस'चं सबस्क्रिप्शन पुढे सुरू ठेवायचं नसेल म्हणजे त्याला रिन्यू करायचं नसेल तर तुम्ही ते रिन्यूअल डेटच्या 24 तास आधी रद्द करणं आवश्यक आहे.

या सशुल्क सेवेमध्ये कोणते फीचर्स आहेत?

'व्हॉट्सॲप प्लस' प्रीमियम सबस्क्रिप्शनसाठी उपलब्ध असणारी फीचर्स किंवा वैशिष्ट्यांची माहिती मेटानं दिली आहे. ती पुढीलप्रमाणे,

  • मेटानं व्हॉट्सॲप प्लसच्या प्रीमियम सबस्क्रिप्शनद्वारे उपलब्ध असणाऱ्या फीचर्सची यादी दिली आहे.
  • तुम्ही स्पेशल इफेक्ट्ससह प्रीमियम स्टिकर्स पाठवू शकता.
  • खास ॲप थीम्स आणि आयकॉन्सचा वापर करून युजर्स व्हॉट्सॲपचं स्वरुप म्हणजे त्याचं दिसणं त्यांच्या पसंतीनुसार बदलू शकतात.
  • तुम्हाला 20 चॅट्सपर्यंत पिन करता येणार आहेत (सध्या तुम्ही फक्त 3 चॅट्सपर्यंत पिन करू शकता).
  • महत्त्वाच्या कॉन्टॅक्ट्ससाठी तुम्हाला खास रिंगटोन सेट करता येणार आहेत (सध्या फक्त एकच सामायिक रिंगटोन सेट करता येतो).
  • तुम्ही चॅट लिस्ट्ससाठी स्वतंत्र किंवा वेगळा अलर्ट, रिंगटोन आणि थीम सेट करू शकता.

या नवीन सुविधा वेगळ्या कशा आहेत?

स्टिकर्स: स्टिकर्स निवडण्याचं फीचर व्हॉट्सॲपमध्ये आधीपासूनच आहे. या नव्या फीचरमध्ये तुम्हाला खास स्टिकर्सची निवड करण्याची आणि त्याचा वापर करण्याची सुविधा आहे. हे स्टिकर्स व्हॉट्सॲप प्लस लेबलसह उपलब्ध असणार आहेत.

चॅट पिन: महत्त्वाचे, ज्यावर वारंवार संवाद साधला जातो असे वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट्सना सर्वात वरच्या बाजूला पिन करून ठेवण्याची सुविधा आताही उपलब्ध आहे. या चॅट्सना प्रत्येक वेळेस शोधण्याची गरज कमी करण्यासाठी हे फीचर तयार करण्यात आलं आहे. सध्या व्हॉट्सॲपच्या मोफत आवृत्तीमध्ये तुम्हाला 3 चॅट्स पिन करता येतात. व्हॉट्सॲप प्लसचं सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर तुम्हाला 20 चॅट्सपर्यंत पिन करता येणार आहेत.

रिंगटोन: मोबाईल फोनवरच्या कॉलप्रमाणेच, सध्या तुम्हाला व्हॉट्सॲपमध्येही इनकमिंग म्हणजे तुम्हाला येणाऱ्या कॉलसाठी वेगळा रिंगटोन सेट करता येतो. मात्र सर्व कॉन्टॅक्ट्ससाठी तुम्हाला फक्त एकच रिंगटोन सेट करता येतो. या नवीन सेवेमध्ये तुम्हाला विशिष्ट कॉन्टॅक्ट्ससाठी प्रीमियम रिंगटोन सेट करता येणार आहेत.

चॅट लिस्ट्ससाठी विशेष फीचर्स: व्हॉट्सॲपमध्ये सध्या चॅट लिस्टचं फीचर स्क्रीनवर सर्वात वरच्या बाजूला उपलब्ध आहे. त्याचा अर्थ तुम्ही एखाद्या टॉपिक किंवा विषयाखाली निवडक चॅट्स एकत्र ठेवू शकता. व्हॉट्सॲपमध्ये यासाठी एक वेगळी थीम ठेवण्याचीची सुविधा उपलब्ध आहे. तर व्हॉट्सॲप प्लसमध्ये तुम्ही प्रत्येक चॅट लिस्टसाठी एक वेगळा अलर्ट, वेगळी थीम आणि वेगळा रिंगटोन ठेवू शकता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)