खान सरांच्या कोचिंग सेंटरबाहेर गोळीबाराचा आरोप; आतापर्यंत काय माहिती समोर आलीय?

खान सर
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

बिहारच्या पाटण्यात मंगळवारी (2 जून) रात्री शिक्षक आणि युट्युबर असलेल्या खान सरांच्या कोचिंग सेंटरबाहेर कथितरित्या गोळीबार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, या हल्ल्यात एक सुरक्षा रक्षक गंभीररित्या जखमी झाला आहे. कोचिंग सेंटरच्या बाहेर गोळीबारदेखील झाला असल्याचा दावा खान सरांनी केला आहे. मात्र, पोलिसांनी गोळीबाराच्या घटनेला दुजोरा दिलेला नाहीये.

बुधवारी (3 जून) सकाळी खान सरांच्या कोचिंगच्या बाहेर विद्यार्थी मोठ्या संख्येनं गोळा झाले. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पाटणा शहराच्या पोलीस अधीक्षकांनी (एसपी) सांगितलं की, या घटनेमध्ये सहभागी असलेल्या 10-12 संशयितांची ओळख पटवण्यात आली आहे.

पाटणा पोलिसांनी मंगळवारी (2 जून) रात्री वक्तव्यं जारी करून सांगितलं की काहीजणांनी खान ग्लोबल स्टडीज कोचिंग सेंटरवर दगडफेक करून परिसराची तोडफोड केल्याची माहिती मिळाली होती.

पोलिसांच्या निवेदनात म्हटलं आहे, "घटनास्थळाच्या जवळपासच्या लोकांची चौकशी केल्यानंतर तसंच जवळपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजमधून असं समोर आलं आहे की पाटण्यातील ज्ञान बिंदू कोचिंग सेंटरशी संबंधित 15-20 जणांनी दगडफेक आणि तोडफोड केली आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून गोळीबार झाल्याचं दिसून आलेलं नाही."

प्रसारमाध्यमांमधील वृत्तांनुसार, हा हल्ला झाला त्यावेळेस कोचिंग इन्स्टिट्यूटमधील वर्ग संपले होते.

पोलिसांनी काय सांगितलं?

फोटो स्रोत, Patna Police

फोटो कॅप्शन, पाटणा पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात निवेदन जारी केलं आहे

घटनेची माहिती मिळताच पाटण्याचे एसएसपी, डीएसपी यांच्यासह पोलीस दलाची अनेक पथकं कोचिंग सेंटर पोहोचली.

एसपी कार्तिकेय शर्मा एएनआयला म्हणाले, "या हल्ल्यात सुरक्षा रक्षक जखमी झाल्याची माहिती आहे. या प्रकरणात सुरक्षा रक्षक आणि स्थानिक लोकांचे जबाब नोंदवून तपास केला जात आहे. जखमी व्यक्तीवर उपचार सुरू आहेत."

पोलिसांनी काय सांगितलं?

पाटणा शहराच्या एसपी दीक्षा म्हणाल्या की, आतापर्यंत 10 ते 12 लोकांची ओळख पटवण्यात आली आहे.

त्या पत्रकारांना म्हणाल्या, "यात सामील असलेले लोक रस्त्याच्या पलीकडे असलेल्या कोचिंग सेंटरशी संबंधित असू शकतात. सध्या सर्व तथ्यांची पडताळणी केली जात आहे. अधिकृत तक्रारी दाखल केल्या जात आहेत आणि पुढील प्रक्रिया सुरू आहे."

पाटणा शहराच्या पोलीस अधीक्षक दीक्षा यांनी सांगितलं की 10-12 जणांची ओळख पटवण्यात आली आहे

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, पाटणा शहराच्या पोलीस अधीक्षक दीक्षा यांनी सांगितलं की 10-12 जणांची ओळख पटवण्यात आली आहे

त्यांनी पुढे सांगितलं, "सर्व व्हीडिओ फुटेजची सखोल तपासणी केली जात आहे. तसंच प्रत्येक पैलूची पडताळणी केली जात आहे. एक जण जखमी झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. सध्या त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सीसीटीव्ही फुटेजचं विश्लेषण केलं जात आहे."

याआधी पाटण्याचे एसएसपी कार्तिकेय के शर्मा म्हणाले होते, "या प्रकरणात सहभागी आढळणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल."

खान सर काय म्हणाले?

पत्रकारांशी बोलताना खान सरांनी शंका व्यक्त केली आहे की "हल्लेखोरांचा संबंध कोचिंग इन्स्टिट्यूट्सशी असू शकतो."

"वर्ग संपलेले होते. बिहारच्या पोलीस भरतीचे निकाल आलेले होते. हजारो उमेदवार यशस्वी झाले होते. आम्ही थकलेलो होतो. त्याचवेळेस काही समाजकंटक आले, आम्हाला धमकावू लागले आणि सुरक्षा रक्षकांना मारहाण केली," असं ते म्हणाले.

खान जी. एस. रिसर्च सेंटरची लायब्ररी
फोटो कॅप्शन, खान जी. एस. रिसर्च सेंटरची लायब्ररी
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"दहा मिनिटांच्या आत गोळ्यांचे कमीत कमी 8-10 राउंड झाडण्यात आले. सर्वत्र गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. ऑफिसची पूर्ण मोडतोड करण्यात आली आहे," असा दावा खान सरांनी केला.

"सुरक्षा रक्षकाला मारहाण करून इतकं रक्तबंबाळ केलं की त्याला पीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आलं आहे. पाहा इथे काय सुरू आहे. हे समाज कंटक आहेत," असं ते पुढे म्हणाले.

संशयितांची ओळख पटवल्याचा दावा करत खान सर म्हणाले, "लोकांची ओळख पटवण्यात आली आहे. सुरक्षा रक्षकानंदेखील त्यांची ओळख पटवली आहे. त्यांचा संबंध कोचिंग इन्स्टिट्यूट्सशी असल्याचं दिसतं. आमच्या कमी शुल्कामुळे ते त्रस्त आहेत. मला वाटतं की गरिबांना देखील शिकण्याचा अधिकार आहे."

"मला सुरक्षा मिळायला हवी. मात्र ते प्रशासनावर अवलंबून आहे. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आलं आहे," असं ते म्हणाले.

"आमच्या सुरक्षा रक्षकानंदेखील हल्लेखोरांची ओळख पटवली आहे. हे लोक जवळच्याच कोचिंग सेंटरमधील आहेत. या घटनेमागे जवळपासचं कोचिंग सेंटर असल्याचं स्पष्ट आहे. त्यांनी अशी वक्तव्यंदेखील केली आहेत. त्यात म्हटलं आहे की ते खान सरांच्या कोचिंग सेंटरला उडवून देतील," असं खान सर म्हणाले.

खान सर कोण आहेत?

मुसल्लहपूर हाट परिसर, हे बिहारची राजधानी असलेल्या पाटण्यातील एक प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे. इथेच खान सर यांचं कोचिंग सेंटर आहे.

'खान जीएस रिसर्च सेंटर' हे या परिसरातील एक प्रमुख कोचिंग सेंटर आहे. प्रसिद्ध खान सर त्याचे संचालक आहेत. त्यांचं पूर्ण नाव फैजल खान आहे.

उत्तर प्रदेशातील देवरियामधील एका शाळेत घेतलं त्यांनी त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. नंतर खान सरांनी अलाहाबाद विद्यापीठातून पदवी घेतली आहे.

खान सरांचा दावा आहे की त्यांनी आयआयएम अहमदाबादमधून स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचं शिक्षणदेखील घेतलं आहे. कोरोनाच्या काळातील लॉकडाऊनमुळे त्यांचं युट्यूब चॅनेल अनेक लोकांपर्यंत पोहोचलं असं त्यांचं म्हणणं आहे.

खान सर

फोटो स्रोत, ANI

याच काळात खान सरदेखील अतिशय प्रसिद्ध झाले. विशेषकरून स्थानिक शैलीत शिकवण्याच्या आणि समजावण्याच्या त्यांच्या पद्धतींमुळे ते खूप चर्चेत आले.

खान सर मूळचे बिहारच्या सीमेला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील देवरियाचे रहिवासी आहेत.

खान सर विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांच्या सेंटरमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र खान सर त्यांच्या वक्तव्यांमुळे वादात देखील सापडले आहेत.

खान सर फक्त विद्यार्थ्यांमध्येच लोकप्रिय नाहीत तर ते सर्वसामान्य लोकांमध्ये देखील एक परिचित नाव आहे. 'खान जीएस रिसर्च सेंटर' या त्यांच्या युट्यूब चॅनलचे 2.9 कोटींहून अधिक सबस्क्राईबर आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)