हजारो फूट उंचीवर विमान असताना फुटली खिडकी; विमानाबाहेर खेचल्या गेलेल्या नवऱ्याचा बायकोने असा वाचवला जीव

ल्युबिसा कारोविच (61 वर्षे) आणि त्यांच्या पत्नी स्वेतलाना ग्रकोविच मॅक्सिमोविच

फोटो स्रोत, Facebook/Karovic Ljubisa

    • Author, रेचल फ्लिन
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

विमान हवेत उडताना अचानक विमानाची खिडकी फुटली आणि हवेच्या दबावामुळे त्यातील एक प्रवासी बाहेर खेचला गेला.

त्या प्रवाशाचे डोके आधी खिडकी बाहेर गेले आणि हवेच्या दबावामुळे ती पूर्ण व्यक्तीच विमानाबाहेर पडली असते. हे होत असताना विमान हजारो फुटांच्या उंचीवर हवेत होते. पण तत्काळ या प्रवाशाच्या पत्नीने त्याचे पाय पकडून त्याला धरून ठेवले. इतर प्रवाशांनीही मदत केल्यानं खिडकीतून बाहेर खेचला गेलाला प्रवासी बचावला आहे.

ही घटना रायनएअर विमानात घडली. हे विमान रायनएअरची उपकंपनी माल्टा एअरकडून चालवले जात होते.

अपघातग्रस्त प्रवाशाचे नाव ल्युबिसा कारोविच (61 वर्षे) आणि त्यांच्या पत्नीचे नाव स्वेतलाना ग्रकोविच मॅक्सिमोविच असे आहे. ते दोघे ग्रीसमधील थेस्सलोनिकी येथून जर्मनीमधील मेमिंगेनला जात होते.

ट्रॅकिंग डेटानुसार, रायनएअरचे विमान सुमारे 10 मिनिटे हवेत होते, तेव्हा ते अचानक 9,000 फूट (2,700 मीटर) खाली आले.

विमानाच्या खिडकीतून बाहेर खेचला गेलेला व्यक्ती कसा बचावला?

रायनएअर विमानाच्या खिडकीतून बाहेर खेचला गेलेल्या व्यक्तीचे त्याच्या पत्नीने पाय धरून ठेवले असल्यामुळे जीव वाचला.

पत्नीने बीबीसी सर्बियाला सांगितले, "त्याचा उजवा खांदा आणि डोके विमानाच्या बाहेर होते. जवळपास 2 मिनिटांनंतर इतर 2 प्रवाशांनी त्याला आत परत खेचण्यास कशी मदत केली."

"आम्ही त्याला पुन्हा सावरले. त्याचा संपूर्ण चेहरा विद्रूप झाला होता आणि त्याच्या नाकातून व तोंडातून रक्त वाहत होते," असंही पत्नीने नमूद केलं.

सर्बियन वृत्तसंस्था 'नोव्हा'शी बोलताना स्वेतलाना म्हणाल्या, "घटना घडल्यावर मी तत्काळ त्यावर प्रतिसाद दिला आणि त्याचे पाय पकडले. माझ्या मनात विचार आला की, जर आपण मेलो, तर आपण एकत्र मरू."

मॅक्सिमोविच यांनी ग्रीसची सरकारी वृत्तवाहिनी ईआरटीला असेही सांगितले की, विमानाच्या इंजिनचा एक भाग तुटून खिडकीवर पडल्यासारखे वाटले. त्यामुळे त्यांच्या पतीच्या शेजारील खिडकी फुटली आणि केबिनमधील दाब कमी झाला. इतर प्रवाशांनीही स्फोटासारखा आवाज ऐकल्याचे सांगितले.

प्रवाशांनी यापूर्वी स्थानिक माध्यमांना सांगितले होते की, कारोविचने सीटबेल्ट लावला होता. त्यामुळे त्याचे डोके आणि खांदे बाहेर असतानाही विमानात असलेल्यांना त्याला धरून ठेवण्यास मदत झाली.

रायनएअर विमान

फोटो स्रोत, Chris Radburn/PA Wire

मॅक्सिमोविच यांनी सांगितले की, त्यांचा पती गंभीर जखमी झाला असून या घटनेने त्याला धक्का बसला आहे.

"तो जिवंत असणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याच्या हाताला विशेषतः गंभीर दुखापत झाली आहे आणि तो भाजला आहे. तो बोलू शकत नाही. त्याला संपूर्ण घटना आठवत नाही," असंही त्यांनी नमूद केलं.

त्या ईआरटी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या, "जेव्हा जेव्हा तो विमानांबद्दल ऐकतो, तेव्हा तो थरथर कापायला लागतो. माझी मानसिक अवस्था सुद्धा खूप वाईट झाली आहे. त्यावेळी, मला आमच्या जीवाची भीती वाटत होती. विमान कोसळेल अशी मला भीती वाटत होती."

विमानाची खिडकी फुटली आणि त्यातून प्रवासी बाहेर पडू लागला होता

फोटो स्रोत, From BBC News

फोटो कॅप्शन, विमानाची खिडकी फुटली आणि त्यातून प्रवासी बाहेर पडू लागला होता

"त्या भयानक अनुभवाबद्दल विचार करणे थांबवता येत नाहीये. जे घडलं त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी मी सतत काहीतरी करत असते, पण ती दृश्यं काही केल्या डोळ्यासमोरून जात नाहीत. या घटनेनंतर आता मी लिफ्टमध्ये शिरले, तरी मला अचानक गुदमरल्यासारखं वाटू लागलं," अशी माहिती मॅक्सिमोविच यांनी दिली.

आता आपण पुन्हा कधी विमानात बसू शकू का, असाही प्रश्न त्यांना पडतो.

रायनएअरने एका निवेदनात म्हटले होते, "थेस्सलोनिकीहून मेमिंगेनला जाणारे त्यांचे विमान उड्डाणानंतर लगेचच परत आले. कारण विमानात असताना प्रवाशाच्या खिडकीचा एक भाग निखळला."

"विमान व्यवस्थित जमिनीवर उतरले आणि प्रवासी टर्मिनलवर परतले. एका प्रवाशाने थेस्सलोनिकी येथे जमिनीवर वैद्यकीय मदतीची विनंती केली आणि ती त्याला मिळाली," असे या एअरलाइनने सांगितले.

तज्ज्ञांनी काय सांगितलं?

पीडित कुटुंबाने नियुक्त केलेल्या एका तांत्रिक सल्लागाराच्या मते, ही घटना विमानाच्या उजव्या इंजिनमधील बिघाडामुळे सुरू झाली. त्यामुळे विमानाचे अवशेष केबिनच्या खिडकीवर आदळून ती फुटली आणि त्यानंतर केबिनमधील हवेचा दाब झपाट्याने कमी झाला असे सांगितले होते.

गेल्या आठवड्यात बीबीसी न्यूजने एक वृत्त दिले. या घटनेचे काय कारण असू शकते याची एअरलाईन तर्फे प्राथमिक चौकशी करण्यात आली.

या एअर लाइनचे प्रमुख मायकल ओ'लिअरी यांनी याबाबत सांगितले की इंजिनला 'फॉरेन ऑब्जेक्ट डॅमेज' झाल्या मुळे ही घटना घडली असण्याची शक्यता आहे.

पुढे ते म्हणाले की 'टेकऑफच्या वेळी इंजिनाला नुकसान झाले आणि त्यामुळे ही घटना घडली असावी. पण आपण निश्चित सांगू शकत नाही.'

त्यांनी पुन्हा सांगितले की हे '18 वर्षं जुनं असलेल्या बोईंग 737 फ्लाईटची गेल्या दोन वर्षांत पूर्ण सर्व्हिस झालेली होती.'

ल्युबिसा कारोविच (61 वर्षे) आणि त्यांच्या पत्नी स्वेतलाना ग्रकोविच मॅक्सिमोविच

हे विमान रायनएअरच्या माल्टा एअर या कंपनीतर्फे चालवले जात होते.

फॉरेन ऑब्जेक्टमुळे (बाहेरील एखाद्या वस्तू) हे नुकसान झाल्याची पुष्टी झाल्यास, या घटनेप्रकरणी रायनएअर किंवा बोईंग यांच्या उत्तरदायित्वावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

या प्रकरणाचा तपास अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) कडून सुरू आहे. प्राथमिक अहवाल सुमारे 28 दिवसांत प्रसिद्ध केला जाईल, असं ओ'लिअरी यांनी सांगितलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)